News Flash

निश्चलनीकरणाच्या निर्णयाचे परदेशी माध्यमांकडूनही स्वागत

जगभरच्या विविध प्रसारमाध्यमांनी या निर्णयाची नुसतीच दखल घेतली नाही

मात्र मर्यादांकडेही बोट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे परदेशी प्रसारमाध्यमांनीही धाडसी निर्णय म्हणून स्वागत केले आहे.

जगभरच्या विविध प्रसारमाध्यमांनी या निर्णयाची नुसतीच दखल घेतली नाही तर त्याचे विश्लेषण करण्यासाठी मोठी जागा खर्ची घातली आहे. त्यात अगदी अमेरिकेपासून चीन आणि पाकिस्तानमधील माध्यमांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांच्या लिखाणाचा सूर बराचसा सकारात्मक आहे. मात्र भ्रष्टाचाराला पूर्णपणे पायबंद घालण्यासाठी हा निर्णय पुरेसा नाही याकडेही लक्ष वेधले आहे. तसेच या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना सहन कराव्या लागलेल्या त्रासाबद्दलही लिहिले आहे.

‘इंडिया रुपी बॅन : करन्सी मूव्ह इज बॅड इकॉनॉमिक्स’ या शीर्षकाखाली बीबीसीचे भारतातील प्रतिनिधी सौतिक बिस्वास यांनी या निर्णयावर वार्ताकन केले आहे. त्यात जागतिक बँकेचे माजी प्रमुख अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी म्हटले आहे की, या निर्णयाची अंमलबजावणी करताना होणारा त्रास हा निर्णयाच्या फायद्यांपेक्षा अधिक आहे. ‘कोलॅटरल डॅमेज इज लाइकली टू आऊटस्ट्रीप इट्स बेनिफिट्स’ असे बसू यांनी म्हटले आहे.

‘पॅनिक, अँगर अँड अ स्क्रॅम्बल टू स्टॅश कॅश अमिड इंडियाज ब्लॅक मनी स्क्विझ’ अशा शीर्षकाखाली दिलेल्या बातमीत ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने नागरिकांच्या मनोभूमिकेची दखल घेतली आहे. भ्रष्टाचार संपुष्टात आणणे याला नरेंद्र मोदी यांनी प्रथमपासून प्राधान्य दिले होते. मात्र त्यांच्या स्वेच्छेने मिळकत जाहीर करण्याच्या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. देशात अंदाजे ४०० अब्ज ते १ ट्रिलियन डॉलर इतका काळा पैसा आहे. या योजनेतून केवळ १९ अब्ज डॉलर इतकाच काळा पैसा उघड होऊ शकला, असे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे.

‘द सिडनी मॉर्निग हेराल्ड’ने मोदींच्या या निर्णयाची तुलना युरोपियन सेंट्रल बँकेच्या ५०० युरोच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाशी केली आहे. तसेच हा निर्णय अभूतपूर्व असल्याचेही म्हटले आहे.

या निर्णयामुळे भारतातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोदींची तुलना सिंगापूरचे दिवंगत नेते ली क्वान यू यांच्याशी कशी केली. ते ‘द इंडिपेंडंट’ने छापले आहे. ‘मोदी डज ओ ली क्वान यू टू स्टँप आऊट करप्शन इन इंडिया’ असे या बातमीचे शीर्षक आहे.

‘क्राऊड्स लाइन अप अ‍ॅट इंडियाज बँक्स टू एक्स्चेंज बॅन्ड रुपी नोट्स’ अशा शीर्षकाखाली ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने ग्राहकांच्या त्रासाची दखल घेतली आहे. तसेच हा निर्णय धाडसी असला तरी कसा धोकादायक आहे, त्याकडेही लक्ष वेधले आहे. देशात चलनात असलेल्या एकूण नोटांपैकी ८० टक्के नोटा पाचशे आणि एक हजाराच्या होत्या. त्या रद्द केल्याने मोठा चलनतुटवडा निर्माण झाला आहे हे या बातमीत अधोरेखित केले आहे.

नोटा रद्द केल्याने निर्माण झालेल्या चलनतुटवडय़ाच्या काळात भारतातील सरकारी बाँड्सना बरे दिवस आले आहेत, असे ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने म्हटले आहे. ‘इंडियाज ब्लॅक मनी एक्स्परिमेंट शाइन्स ब्राइट फॉर बाँड्स’ असे त्याचे शीर्षक सांगते. तसेच मोदींच्या या निर्णयाची फळे दिसण्यासाठी काही काळ जावा लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.

चीनच्या सरकारी मालकीच्या ‘ग्लोबल टाइम्स’ने मोदींचा हा निर्णय धाडसी, पण अपुरा असल्याचे म्हटले आहे. त्याने काळ्या पैशावर काहीसे नियंत्रण येईल पण पूर्णपणे नष्ट होणार नाही, असे चीनचे म्हणणे आहे. तसेच पाकिस्तानच्या ‘डॉन’, ‘द एक्स्प्रेस ट्रिब्युन’ अशा वर्तमानपत्रांच्या संकेतस्थळांवरही या निर्णयाचे ‘इंप्रेस्ड’, ‘व्हिजनरी’, ‘सुपर्ब’, ‘बोल्ड’ अशा शब्दांत कौतुक केले आहे. पाकिस्तानी माध्यमे आणि वाचकही या निर्णयाने प्रभावित झाल्याचेच त्यातून दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:42 am

Web Title: foreign media comment on rs 500 and 1000 notes ban
Next Stories
1 पाचशे, हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय धाडसी
2 विविध न्यायालयांतील याचिकांच्या कार्यवाहीला स्थगितीची विनंती
3 पराभवानंतर घराबाहेर पडावेसे वाटत नव्हते – हिलरी क्लिंटन
Just Now!
X