परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे गुरुवारपासून चार दिवसांच्या युरोप दौऱ्यावर जात असून ते स्लोव्हेनिया, क्रोएशिया व डेन्मार्क या देशांना भेट देणार आहेत. या देशांशी द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी ते प्रयत्न करतील. तसेच युरोपीय समुदाय आणि भारत यांच्यातील संबंध सुधारण्यावरही त्यांचा भर असणार आहे.

जयशंकर हे प्रथम स्लोव्हेनियाला जाणार असून तेथे ते युरोपीय समुदायातील देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी एका परिसंवादात सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, स्लोव्हेनियाचे समपदस्थ अँझे लॉग यांच्याशी जयशंकर संवाद साधतील. स्लोव्हेनिया सध्या युरोपीय समुदायाचा अध्यक्ष आहे. त्यांनी जयशंकर यांना परराष्ट्र मंत्र्यांच्या अनौपचारिक परिषदेसाठी आमंत्रित केले होते. स्लोव्हेनियातील ब्लेड स्ट्रॅटेजिक फोरम कार्यक्रमात ते सहभागी होणार असून आणखी एका विषयावरील परिसंवादात त्यांचे भाषण होणार आहे.

अफगाणिस्तानातील बदलती परिस्थिती चर्चेचा प्रमुख विषय

युरोपातील बैठकांमध्ये अफगाणिस्तानातील बदलती परिस्थिती हा चर्चेचा प्रमुख विषय आहे. ३ सप्टेंबरला ते क्रोएशियाला जाणार असून तेथे त्यांची परराष्ट्र मंत्री गॉर्डन ग्रिलिक रॅडमन यांच्याशी व क्रोएशियाच्या प्रमुखांशी चर्चा होईल. ४ ते ५ सप्टेंबरला ते डेन्मार्कला जाणार असून भारत- डेन्मार्क गोलमेज परिषदेत सहभागी होतील. डॅनिश परराष्ट्र मंत्री जेपी कोफॉड यांच्यासमवेत ते एका संयुक्त आयोगाच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.