लडाखमधील नियंत्रण रेषेवरुन सुरु असलेल्या वादावर चीनसोबत झालेल्या चर्चेतून काय हाती येईल याबाबत आपण कोणताही अंदाज लावू इच्छित नसल्याचं केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. “चर्चा सुरु असून सध्या प्रगतीपथावर आहे. जे सुरु आहे त्याबाबत अंदाज लावू नयेत हा कोणत्याही बाबतीत पहिला नियम असतो,” असं एस जयशंकर यांनी सांगितलं आहे. ‘ब्लुमबर्ग इंडिया इकॉनॉमिक फोरम’ कार्यक्रमात ते बोलत होते. भारत आणि चीनदरम्यान कमांडर स्तरावरील चर्चेचा सातवा टप्पा पार पडला आहे.

यावेळी एस जयशंकर यांना भारत आणि चीनमध्ये नियंत्रण रेषेवरुन सुरु असलेल्या वादासंबंधी विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, “भारत-चीनमध्ये जे काही सुरु आहे ते गोपनीय आहे. मी यावर सार्वजनिकपणे जास्त काही बोलू शकणार नाही. ते कशा पद्धतीने पुढे जातं हे पहावं लागेल”.

लडाखमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर चीनने सर्व ठिकाणांहून आपलं सैन्य मागे घेण्यासंबंधी ठराव झाल्याची चर्चा होती. पण सध्या तरी त्यावर अमलबजावणी झालेली दिसत नाही. चीनने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीनंतर सुरु केलेली प्रक्रिया फक्त अर्ध्यावरच सोडली नाही तर नव्याने नियमांचं उल्लंघन करत नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. चीनकडून फक्त सीमा परिसर नाही तर लडाखमधील अनेक पुलांच्या उद्धाटनालाही विरोध करण्यात आला आहे. गुरुवारी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा चीनला स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे.

“जम्मू काश्मीर आणि लडाखमधील केंद्रशासित प्रदेशात भारताचा अविभाज्य घटक होते आणि राहतील. भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये लक्ष घालण्याची चीनला गरज नाही. ज्याप्रमाणे इतरांकडून अपेक्षा करता त्याप्रमाणे इतर देशही भारताच्या अंतर्गत गोष्टींवर भाष्य करणार नाहीत अशी अपेक्षा आहे,” असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे.

“सीमेवर शांतता राखण्यासाठी 1993 मध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये सुधारणा झाली आहे.” असंही एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.