परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्या येत्या मंगळवारच्या पाकिस्तान भेटीचे काही नाटय़मय परिणाम होण्याची भारताला अपेक्षा नाही. त्यांची ही ‘सार्क यात्रा’ असून पाकिस्तान यात्रा नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘सार्क’ देशांशी संपर्क साधण्याच्या भारताच्या प्रयत्नाचा भाग म्हणून जयशंकर हे रविवारी भूतानला, तर सोमवारी बांगलादेशला जातील आणि मंगळवारी ढाक्याहून इस्लामाबादला रवाना होतील.
भारताने गेल्या वर्षी पाकिस्तानसोबतची सचिवस्तरीय बोलणी रद्द केल्यानंतर सात महिन्यांनी जयशंकर यांची ही भेट होत असल्यामुळे प्रसारमाध्यमांनी त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या भेटीचा मूळ उद्देश सार्क देशांपर्यंत पोहोचणे हा असला, तरी त्यात द्विपक्षीय मुद्देही चर्चेला येऊ शकतात.
जयशंकर यांची पाकिस्तानशी बोलणी होतील त्या वेळी काही नाटय़मय निष्कर्ष निघाले, तर मला आश्चर्य वाटेल. या भेटीचे दोन्ही देशांच्या संबंधांवर काय परिणाम होतील याचे आताच भाकीत करणे कठीण आहे, असे एक अधिकारी म्हणाला.