बंगळूरु : नुकत्याच जाहीर झालेल्या इन्फोसिसच्या चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील ‘संशयास्पद’ नफारूपी ताळेबंदाची दखल अमेरिकेतून घेतली गेली असून या प्रकरणात नुकसान झाल्याचा दावा करत कंपनीच्या विदेशी भागीदारांनी कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.

दरम्यान कंपनीचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य वित्तीय अधिकारी यांची पाठराखण केली असून कंपनीच्या अंतर्गत लेखा परीक्षणाचे अंतर्गत अधिकार उभयतांना दिले आहेत. कंपनी सुशासनानुसार, याबाबत कार्यवाही होईल, असेही निलेकणी यांनी स्पष्ट केले आहे. देशातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष गेल्याच आठवडय़ात जाहीर केले. मात्र कंपनीतील एका कर्मचाऱ्यानेच इन्फोसिसच्या संचालक मंडळाला निनावी पत्र लिहून कंपनीने ताळेबंदातील नफ्याचे आकडे फुगविल्याचा आरोप केला.

याबाबत गहजब झाला असतानाच अमेरिकेतील ‘रोझन लॉ फर्म’ या विधी कंपनीने इन्फोसिसविरुद्ध कायदेशीर पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. ही विधी कंपनी कंपनीतील विदेशी भागधारकांचे नेतृत्व करते. विधी कंपनी या प्रकरणात झालेल्या नुकसानाकरिता भरपाईची कायद्याच्या आधारे मागणी करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी या पाश्र्वभूमीवर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख व मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय यांनाच चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या माध्यमातून ज्यांच्यावर ताळेबंद फुगविण्याचे आरोप झाले त्यांचीच पाठराखण केली जात असल्याचे मानले जात आहे.

भांडवली बाजारात ५३,५०० कोटींचा फटका

संशयास्पद आर्थिक ताळेबंदावरील चर्चेचा फटका इन्फोसिसच्या समभाग मूल्याला मंगळवारी, घटनेनंतरच्या पहिल्याच व्यवहाराला बसला. मुंबई शेअर बाजारात कंपनीचे समभागमूल्य व्यवहारात १७ टक्के घसरणीसह त्याच्या गेल्या सहा वर्षांच्या तळात पोहोचले. परिणामी कंपनीचे बाजार भांडवल एकाच सत्रात थेट ५३,५०० कोटी रुपयांनी कमी झाले.