, शैक्षणिक संस्थांची श्रेणी जाहीर
भारत हे दर्जेदार शिक्षणासाठी उचित ठिकाण असल्याचे स्पष्ट करून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी, शैक्षणिक संस्थांची श्रेणी जाहीर केल्याने आणि परदेशात प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय आयआयटींनी घेतल्याने भारतात परदेशी विद्यार्थ्यांचा ओघ वाढेल, असे मत व्यक्त केले आहे.
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने (आयसीसीआर) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात इराणी यांनी शैक्षणिक आणि सांस्कृतिक मुत्सद्देगिरीचे महत्त्व अधोरेखित केले. शिष्यवृत्तीच्या आधारावर परदेशी विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित ठेवायची की विविध क्षेत्रातील गुणवत्तेबद्दल त्यांना निमंत्रित करावयाचे हे देशातील शैक्षणिक संस्थांसमोरील आव्हान आहे, भारत हे दर्जेदार शिक्षणासाठी उचित ठिकाण आहे, असे इराणी म्हणाल्या.
नॅशनल इन्स्टिटय़ूशनल रँकिंग फ्रेमवर्कने (एनआयआरएफ) भारतातील शैक्षणिक संस्थांना श्रेणी दिल्या असून त्या ४ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहेत, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या माहितीच्या आधारे परदेशी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी जवळपास ३६००हून अधिक शैक्षणिक संस्थांनी श्रेणीसाठी आपली माहिती उपलब्ध करून दिली आहे. या वेळी इराणी यांनी जवळपास आठ देशांमध्ये प्रवेश परीक्षा घेण्याचे आयआयटीच्या परिषदेने प्रस्तावित केल्याचा संदर्भ दिला.
परदेशी विद्यार्थ्यांचा ओघ वाढला पाहिजे ही गरज मान्य करून आयआयटीच्या परिषदेने २०१७ मध्ये आठ देशांमधील विद्यार्थ्यांना आयआयटी-जेईईला बसण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. गुणवान विद्यार्थ्यांना भारतात योग्य तांत्रिक शिक्षण दिले जाईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही त्या म्हणाल्या.