करोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक ठिकाणी बनावट सॅनिटायझर विक्री करणाऱ्यांना कारवाई करण्यात आली आहे. मात्र केरळमधील एका लोकप्रिय पर्यटनस्थळी कॅफे चालवणाऱ्या एका परदेशी नागरिकाने करोनाच्या साथीचा गैरफायदा घेत ‘करोना विषाणू विरोधी रस’ विकण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीने त्याच्या कॅफेसमोर ‘Anti Corona Virus Juice’ केवळ १५० रुपयांमध्ये मिळेल असा बोर्ड लावला होता.

तिरुवनंतपुरमपासून ४५ किलोमीटरवर असणाऱ्या वारकला येथे ही घटना घडली आहे. येथे एक ब्रिटीश नागरिक कॉफी टेम्पल नावाने कॅफे चालवतो. या कॅफेमध्ये करोना विषाणू विरोधी रस मिळतो अशी जाहिरात त्याने केली होती. स्थानिकांनी ही बाब पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी या कॅफे मालकाची चौकशी केली. त्यावेळी या व्यक्तीने हा रस म्हणजे आलं, लिंबू आणि आवळ्याचा रस आहे असं पोलिसांना सांगितलं. आपण केवळ त्याला करोना विरोधी रस असं नाव दिल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

६० वर्षीय ब्रिटीश व्यक्तीने केवळ त्याच्या दुकानातील नव्या रसाचे नामकरण करोना विरोधी रस असं केलं होतं. यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता. त्याने हा रस कोणालाही विकला नाही. त्यामुळे त्याला सक्त ताकीद देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती वारकला पोलिसांनी दिली आहे.

वारकला येथे वास्तव्यास असणाऱ्या इटालीयन पर्यटकाला करोना झाल्याचे समोर आल्यानंतर स्थानिकांमध्ये भिती वातावरण आहे.