गुजरातच्या महिसागर या जिल्ह्यात असलेल्या खोडियार माता मंदिरात एक मगर अडकून पडली होती. या मगरीची गुजरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सुटका केली. ज्या गावात हे मंदिर आहे तिथले स्थानिक मंदिरात अडकलेल्या मगरीची पूजा करत होते
त्यामुळे या मगरीच्या सुटकेला उशीर झाला असे वनविभागाने म्हटले आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

खोडियार मातेच्या मंदिरात या मगरीला पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत होत होती हे एएनआयने दिलेल्या फोटोंवरून स्पष्ट होतेच आहे. खोडियार मातेच्या मंदिरात ही मगर कशी काय आली ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. ती बहुदा वाट चुकल्याने मंदिरात आली असावी असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र स्थानिक भाविकांनी कुंकू, फुलं वाहून तिची पूजा केल्याचेही दिसते आहे. दरम्यान भाविकांच्या पूजा अर्चनेमुळेच या मगरीची सुटका करण्यात आमचा वेळ गेला असे गुजरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या मगरीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.