पार्टी सुरु असताना त्यात अडथळा आणल्याने वन अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील नल्लामल्ला व्याघ्रप्रकल्प क्षेत्रात ही घटना घडली आहे. इतकंच नाही तर अधिकाऱ्याला आमचा अपमान झाला असल्याचं सांगत आरोपींनी पाय धरुन माफी मागायला लावली. यावेळी त्यांच्यातील एकजण आपण तेलंगणाच्या आमदाराचा मुलगा असल्याचं सांगत होता. पोलिसांनी मात्र अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी एकूण सहाजण तिथे उपस्थित होते. हे सर्वजण देवदर्शनासाठी चालले होते. रात्र झाल्याने सुन्निपाटा येथे थांबले होते. रस्त्याशेजारी सर्वजण दारु पिऊन गोंधळ घालत असताना वन अधिकारी ज्योती स्वरुप यांनी त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितलं.

यानंतर तरुणांनी त्यांच्याशी वाद घालत जाण्यास नकार दिला. त्यांच्यातील एकाने स्वरुप यांच्या कानाखाली मारली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. स्वरुप यांनी तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांची कॉलर पकडून पुन्हा मारहाण करण्यात आली. ग्रामस्थ हा सगळा प्रकार पाहत होते. त्यांच्यातील काहीजणांनी हा प्रकार आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वरुप यांनी माफी मागितल्यानंतरही त्यांचा गोंधळ सुरुच होता. यावेळी एक आरोपी त्यांच्यातील एकजण आमदाराचा मुलगा असल्याचं सांगत होता. मात्र अद्याप त्याबद्दल माहिती मिळालेली नाही. स्वरुप यांनी तेथून निघाल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला.

मारहाण करणाऱ्यांची ओळख दयानंद, श्रीनिवास, अभिनय रेड्डी, कौसर, अशोक कुमार आणि राजू अशी पटली आहे, सर्वजण हैदराबादचे रहिवासी आहेत. राजू वगळता सर्व जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची गाडीही जप्त करण्यात आली आहे. प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest officer beaten for distrubing party in andhra pradesh video viral
First published on: 22-08-2018 at 01:50 IST