काँग्रेस सत्तेत आल्यानंतरच देशात ‘अच्छे दिन’ येतील, असा दावा करणाऱ्या राहुल गांधी यांना भाजपचे केंद्रीय नेते व्यंकय्या नायडू यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा २०१९ साली सत्तेत येण्याचा दावा ऐकून मला आश्चर्य वाटले. मात्र, २०१९ तर विसराच २०९० साल उजाडले तरी काँग्रेस सत्तेत येऊ शकणार नाही, असा टोला नायडू यांनी लगावला.

राहुल गांधी यांनी बुधवारी नवी दिल्लीत बोलताना काँग्रेसच भारतात अच्छे दिन आणू शकेल, असा दावा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांपूर्वी अच्छे दिन आणण्याचे वचन दिले होते. परंतु त्यांना हे आश्वासन पूर्ण करता आले नाही, असे राहुल यांनी म्हटले. भारताच्या पंतप्रधानांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर इतका कधीच उपहास झाला नव्हता तो यावेळी होत असल्याची बोचरी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जनवेदना आंदोलनादरम्यान केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय केवळ स्वतःच्या हट्टासाठी घेतला गेला असे राहुल गांधी म्हटले. नोटाबंदीच्या निर्णयाचे एकाही अर्थतज्ज्ञाने समर्थन केले नाही. अर्थतज्ज्ञांनी या निर्णयाचा विरोधच नव्हे तर थट्टा केली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. तसेच पेटीएम म्हणजे ‘पे टू मोदी’ असे सांगत राहुल यांनी मोदींच्या डिजिटल व्यवहारांच्या घोषणेचीही खिल्ली उडविली.

रामनामाचा जप करणे आणि गरिबांचा माल हडपणे हीच सुटाबुटातील सरकारची विचारसरणी आहे. याच विचासरणीवरोधात तुम्हाला लढा द्यायचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप मिळून देशाचे नुकसान करत आहेत. देशात द्वेष पसरवून आणि निश्चलनीकरणाचा निर्णय घेऊन ते हा हेतू साध्य करू पाहत आहेत, असा आरोपही यावेळी राहुल यांनी केला. हा देश केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत चालवत आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त कुणाच्याही मताला ते किंमत देत नसल्याची टीका त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीचे फार काही महत्त्व वाटत नाही. त्यामुळेच ते विरोधी पक्ष असो वा सल्लागार असो त्यांच्या मताला किंमतच देत नाही असे राहुल यांनी म्हटले. काँग्रेसच्या काळात देशातील प्रत्येक स्वायत्त संस्थेचा आदर केला जात होता परंतु नरेंद्र मोदीच्या काळात मात्र या संस्थेला दुय्यम दर्जा दिला जात आहे असे राहुल यांनी म्हटले होते.