कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. दरम्यान, इथे पक्षाचा कोण उमेदवार उभा आहे हे विसरून जा, त्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नावाने लोकांकडे मतं मागा अशा स्पष्ट सूचना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केल्या आहेत. यावेळी शहा यांच्याकडून सोशल मीडियाबाबतची निवडणूक रणनितीदेखील अंतिम करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहा यांचा नुकताच दोन दिवसीय कर्नाटक दौरा पार पडला. यावेळी त्यांनी दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील बंटवाल येथील मतदान केंद्रांवरील कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मतदान केंद्राप्रमाणे मेहनत घेण्याच्या सूचना पक्ष कार्यकर्त्यांना केल्या आहेत. ते म्हणाले, उमेदवाराला विसरुन जा, तुम्ही फक्त कमळाच्या चिन्हाकडे आणि मोदींच्या फोटोकडे लक्ष द्या. तुमचे काम हे केवळ विधानसभा मतदारसंघ निवडून आणणे हेच असणार नाही तर तुमच्या केंद्रावरही विजय मिळवणे असणार आहे. ज्यावेळी अशा प्रकारचे अनेक केंद्र तुम्ही जिंकून आणाल तेव्हाच आपण निवडणूक जिंकू, असा धडा यावेळी शहा यांनी कार्यकर्त्यांना दिला.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, कर्नाटकात एकूण ५६ हजार निवडणूक केंद्रे आहेत. कर्नाटकात एकूण ४९० लाख मतदार असून प्रत्येक केंद्रावर किमान १२०० मतं आहेत.

बी. एस. येडीयुरप्पा हे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. काँग्रेसकडून राज्याची सत्ता खेचून आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत. यापूर्वी येडीयुरप्पा यांनी कर्नाटकात पहिल्यांदा भाजपचे सरकार स्थापन केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forget candidate ask for votes in name of modi and bjp amit shah tells workers in karnataka
First published on: 22-02-2018 at 17:20 IST