स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज यांच्या राज्यात जसे जातीभेद विसरुन सगळे गुण्यागोविंदाने राहात होते अगदी तशाचप्रकारे जाती-धर्म भेदभाव विसरुन दलित, मराठे आणि बहुजनांनी एकत्र यावे असे आवाहन केंद्रीय सामाजिक आणि न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले. दिल्लीतही शिवजन्माचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले आहे.

नवीदिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील पुतळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी अभिवादन केले.याप्रसंगी पारंपारिक वेशभूषेत  महाराष्ट्रातील मराठी समुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.विशेष करुन अभिवादन रॅलीमध्ये केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून एकात्मता व सौहार्दतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा करून आदर्श राजा’ शिवरायांची शिवशाही आजही सर्व भारतीयांना हवी आहे. शिवाजी महाराजांना सारखे शूर आणि महान व्यक्तिमत्व महाराष्ट्र भूमीत जन्मले याचा आम्हाला अभिमान आहे. राष्ट्रनिर्माणाची मुहूर्तमेढ शिवाजी महाराजांनी जवळपास साडेतीनशे वर्षांपूर्वीच रोवली होती. शिवाजी महाराज हे आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत अशा शब्दांत छत्रपती शिवरायांचा गौरव  रामदास आठवलेंनी आपल्या भाषणात यावेळी केला .