01 March 2021

News Flash

माझी भूमिका मी नागपुरातच स्पष्ट करणार-प्रणव मुखर्जी

संघाच्या मंचावर प्रणव मुखर्जी काय बोलणारे हे पाहणे महत्त्वाचे

संग्रहित छायाचित्र

आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरात होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपले मौन सोडले आहे. मला माझी जी काही भूमिका मांडायची आहे ती भूमिका मी नागपुरात मांडेन असे प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. आनंद बाजार पत्रिका या बंगाली वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निमंत्रण दिल्यानंतर मला अनेक पत्रे आली, काही जणांनी मला फोनही केले. मात्र कोणालाही उत्तर दिलेले नाही. मी माझी भूमिका नागपुरातच स्पष्ट करणार आहे असे मुखर्जी यांनी म्हटले आहे. काँग्रेसमधले काही वरिष्ठ नेते जयराम रमेश, सी. के. जाफर शरीफ, रमेश चेन्निथला यांनी प्रणव मुखर्जी यांना संघाच्या कार्यक्रमाला न जाण्याचा सल्ला दिला आहे. नागपुरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत.

नागपुरात १४ मे पासून तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला सुरुवात झाली. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप ७ जूनला संध्याकाळी ६.३० वाजता रेशीमबाग मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जयराम रमेश यांनी प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये तुमच्यासारख्या एका विद्वान आणि सेक्युलर विचारांच्या माणसाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच संघाशी कोणतीही जवळीक दाखवू नका असेही रमेश यांनी सुचवले आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर प्रणव मुखर्जींनी जाणे हा डाव्या विचारांच्या लोकांसाठी एक झटका आहे असे रमेश चेन्निथला यांनी म्हटले आहे. तसेच या कार्यक्रमाला त्यांनी जाऊ नये असाही सल्ला चेन्निथला यांनी प्रणव मुखर्जी यांना दिला आहे. तर प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे त्यामुळे यावर वाद निर्माण करण्यात काही अर्थ नाही असे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटले आहे. संघाच्या मंचावर जाऊन त्यांच्या विचारधारेत नेमक्या काय कमतरता आहेत हे प्रणव मुखर्जींनी सांगावे असे मत चिदंबरम यांनी व्यक्त केले आहे.

प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले ही चांगली सुरुवात आहे. देशात राजकीय अस्पृश्यता नाही हेच त्यांनी दाखवून दिले आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. प्रणव मुखर्जींनी  निमंत्रण स्वीकारले आहे. ते या मंचावरून नेमकी या भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 10:01 pm

Web Title: formar president pranab mukherjee broke his silence over rss invitation
Next Stories
1 ३० वर्षांपूर्वी मृत घोषित केलेला रशियन वैमानिक अफगाणिस्तानात सापडला जिवंत
2 शेतकऱ्यांचे आंदोलन हा तर पब्लिसिटी स्टंट, केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून जखमेवर मीठ
3 चोली के पिछे क्या है? ऐवजी आता ‘कमळा’च्या खाली काय? हे विचारा-शोभा डे
Just Now!
X