आम आदमी पक्षाच्या माजी नेत्या शाझिया इल्मी यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले.
गेल्या दिल्ली विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत इल्मी यांचा पराभव झाला होता. विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा नाही. मात्र पक्षाच्या निर्देशांचे पालन करू असे सांगत निवडणूक लढवण्याचा पर्याय खुला ठेवला आहे.
पक्षीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन विचार व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घरवापसीबाबत विचारले असता सक्तीने धर्मातर करण्याच्या विरोधात असल्याचे इल्मी यांनी स्पष्ट केले. तसेच घरवापसी कार्यक्रमाचा भाजपचा काही संबंध नसल्याचा दावा
केला.

‘..तर केजरीवालांविरुद्ध लढणार’
पक्षाने आदेश दिल्यास दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीत आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढण्यास आपण तयार आहोत, असे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांनी येथे स्पष्ट केले.

देशाची लूट करणाऱ्यांच्या विरोधात बोला -केजरीवाल
आमच्या पक्षावर नकारात्मक राजकारणाचा आरोप केला जातो. त्यांचा पक्ष सत्तेत येताच देशाची लूट चालवली आहे, त्याबाबत का बोलत नाही असा सवाल आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी किरण बेदी व शाझिया इल्मी यांना केला. एकेकाळी केजरीवाल यांच्या बेदी व इल्मी सहकारी होत्या. सामान्य माणूस सत्तेत येतो ते त्यांना सहन होत नाही असा आरोप केजरीवाल यांनी ट्विटवरून केला आहे. भाजपचे ध्येय केवळ मला पराभूत करण्याचे आहे असा आरोप केजरीवाल यांनी केला. माझा ध्यास दिल्लीला उत्तम शहर बनवण्याचा आहे असा दावा त्यांनी केला.