बांग्लादेश मुक्तियुद्धात कळीची भूमिका बजावणारे माजी लष्करप्रमुख जनरल के. व्ही. कृष्णराव (९२) यांचे शनिवारी लष्करी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्याच पुढाकाराने ऐंशीच्या दशकात भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला होता.
काश्मीरमध्ये दहशतवादाने थैमान घातले असतानाच्या काळातच त्यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. तब्बल चार दशके लष्करी सेवा बजावणारे कृष्णराव देशाचे १४वे ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ होते. ९ ऑगस्ट १९४२ रोजी ते लष्करात दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान म्यानमार, ईशान्य भारत व बलुचिस्तान आघाडीवर त्यांनी शत्रूशी दोन हात केले. १९४७मध्ये काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानविरोधातील युद्धातही त्यांनी भाग घेतला. देशाच्या फाळणीनंतर पूर्व व पश्चिम पंजाबमध्ये उसळलेला हिंसाचाराचा वणवा शांत करण्यासाठी त्यांनी मोलाचे प्रयत्न केले. १९६५-६६ या काळात लडाखमध्ये एका ब्रिगेडचे, तर १९६९-७० या काळात जम्मू विभागातील पायदळाचे त्यांनी नेतृत्व केले. १९७०-७२ या काळात नागालँड व मणिपूरमधील घुसखोरी हाणून पाडणाऱ्या पहाडी तुकडीचेही त्यांनी नेतृत्व केले. याच काळात १९७१च्या बांग्लादेश मुक्तियुद्धात पूर्व आघाडीवर लढणाऱ्या भारतीय लष्कराचे नेतृत्व करताना त्यांनी आसामचा सिल्हेट जिल्हा ताब्यात घेण्यात व ईशान्य बांग्लादेश मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी बजावलेल्या अतुलनीय लष्करी सेवेबद्दल त्यांचा परमविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवही करण्यात आला होता. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर व लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.