२३ वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपा आता फक्त सत्ता मिळवण्यासाठीचा मंच बनल्याचे त्यांनी पक्ष सोडताना म्हटले आहे. त्यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि प्रदेशाध्यक्ष तपीर गाओ यांना याप्रकरणी पत्र लिहिले आहे. सध्याची भाजपा दिवंगत अटलबिहारी वाजपेयींच्या सिद्धांताचे पालन करत नसल्याने मला खूप वाईट वाटत आहे. पक्ष हा सध्या सत्ता मिळवण्याचा मंच झाला आहे. विकेंद्रीकरण आणि लोकशाही प्रक्रियेतून निर्णय घेण्याचा तिरस्कार करणाऱ्यांच्या हाती सध्या पक्ष आहे. ज्या मुल्यांवर पक्षाची स्थापना झाली होती. त्या मुल्यांना आता पक्षात स्थान नाही, अशी खंत त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.

भाजपाला २०१४ मध्ये राज्यात जनादेश मिळाला नव्हता. मात्र दिवंगत कलिखो पुल यांना मुख्यमंत्री करण्यासाठी उचलले प्रत्येक पाऊल चुकीचे होते, असेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधानंतरही भाजपाने सरकार स्थापन केले. कालिखो यांच्या आत्म्हत्येची कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. भाजपाच्या नेतृत्वाने पूर्वोत्तर भाजपाचे सरकार स्थापन करताना नैतिकताही राखली नाही. इतकेच काय तर गतवर्षी १०-११ ऑक्टोबरला पासीघाट येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान सरचिटणीस राम माधव यांनी अनेक सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आपले विचारही मांडू दिले नाहीत. निवडणुकीपूर्वी पेमा खांडू यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा भाजपासारख्या केडरवर आधारित पक्षाकडून अपेक्षित नव्हता.

मी ७ वेळा आमदार राहिलो असून २३ वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. मी भारतीय राजकारणात इंदिरा गांधी, राजीव गांधी, व्ही पी सिंह, आय के गुजराल, एच डी देवेगौडा, चंद्रशेखर, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग सरकारबरोबर काम केले आहे. देशात सर्वाधिक मुख्यमंत्रिपदी राहण्यारे गेगांग अपांग दुसरे राजकीय नेते आहेत.

अपांग हे ईशान्य भारतातील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री होते. यावेळी त्यांनी अमित शाह आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. अपांग हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आहेत.