भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं करोनामुळे निधन झालं आहे. ते ९१ वर्षांचे होते. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दक्षिण दिल्लीमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते अशी माहिती कुटुंबातील सूत्रांनी दिली आहे.

सोली सोराबजी यांनी १९५३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयातून वकिली क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९७१ मध्ये त्यांची सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९८९-९० मध्ये ते भारताचे अ‍ॅटर्नी जनरलपदी नियुक्त झाले. यानंतर १९९८ ते २००४ दरम्यानही ते भारताचे अ‍ॅटर्नी जनरल होते. १९९७ मध्ये नायजेरियासाठी सोराबजी यांची संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेष प्रतिनिधी म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. मार्च २००२ मध्ये त्यांनी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.