बंगबंधूंच्या हत्येच्या कटात सहभागी

ढाका : बांगलादेशचे संस्थापक बंगबंधू शेख मुजिबुर रहमान यांची हत्या करण्यात आलेल्या १९७५ सालच्या बंडातील सहभागाबद्दल लष्कराच्या एका माजी कॅप्टनला, या हत्याकांडानंतर सुमारे ४५ वर्षांनी रविवारी मध्यरात्री फासावर चढवण्यात आले.

अब्दुल माजेद याला स्थानिक प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटांनी फाशी देण्यात आल्याची माहिती कायदा मंत्री अनिसुल हक यांनी दिली. एका डॉक्टरने रात्री १२.१५ वाजता माजेद याला मृत घोषित केल्याचे ढाक्याच्या सीमेवरील केरनीगंज येथील ढाका मध्यवर्ती कारागृहाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

माजेदचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी सोपवला जाईल, असे तुरुंग उपमहानिरीक्षक ब्रिगेडिअर जनरल एकेएम मुस्तफा कमाल पाशा यांनी तुरुंगासमोर पत्रकारांना सांगितले. तर, जिल्हा दंडाधिकारीही असलेले ढाक्याचे उपायुक्त, पोलीस अधीक्षक, सिव्हिल सर्जन आणि कारागृह उपमहानिरीक्षक हे फाशी देतेवेळी हजर होते, अशी माहिती जेलर महबुबुल इस्लाम यांनी नंतर दिली. कोविड-१९ मुळे लागू असलेले निर्बंध झुगारून अनेक लोक मध्यरात्री कारागृहापुढे हजर होते, असेही ते म्हणाले.

जवळजवळ अडीच दशके भारतात लपून राहिलेल्या माजेद याला मंगळवारी ढाक्यात अटक करण्यात आली होती. राष्ट्रपती अब्दुल हमीद यांनी गुरुवारी माजेदची दया याचिका फेटाळून लावल्यामुळे त्याच्या फाशीच्या अंमलबजावणीतील अखेरचा अडथळा दूर झाला होता.

माजेद भारतात लपून होता अशा बातम्या मिळाल्या होत्या, मात्र गेल्या महिन्यात तो गुप्तपणे परतल्यानंतर त्याला ढाका येथून अटक करण्यात आली होती. १९७५ ज्यांना अनुपस्थितीत मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती, अशा ६ फरार लष्करी अधिकाऱ्यांपैकी माजेद एक होता. गेली २३ वर्षे तो गुप्तपणे कोलकात्यात राहात होता, असा दावा त्याने अटकेनंतर केला होता.

झाले काय?

’ बांगलादेशाचे राष्ट्रपिता शेख मुजिबुर रहमान यांची त्यांच्या कुटुंबीयांसह १५ ऑगस्ट १९७५ रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी लष्कराच्या १२ माजी अधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. यापैकी पाच जणांच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली होती, तर एका जणाचा विदेशात नैसर्गिक मृत्यू झाला होता.

’ बंगबंधूंची मोठी कन्या आणि विद्यमान पंतप्रधान शेख हसिना व लहान मुलगी शेख रेहाना या दोघी बंडाच्या वेळी पश्चिम जर्मनीला गेल्या असल्याने बचावल्या होत्या. या बंडात बांगलादेशचे स्वातंत्र्योत्तर सरकार उलथून टाकण्यात आले होते.