भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव जयवंत यशवंत लेले यांचे गुरुवारी रात्री उशीरा ह्रदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. गुरुवारी रात्री लेले यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
सहायक सचिव म्हणून लेले यांनी बीसीसीआयमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जगमोहन दालमिया यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर लेले यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी आली होती. १३ सप्टेंबर रोजीच लेले यांनी आपल्या निवडक मित्रांसोबत ७५वा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळीही जंतूसंसर्गामुळे त्यांची तब्येत ठीक नव्हती. क्रिकेटचे व्यवस्थापक म्हणून केलेल्या कामगिरीवर लेले आत्मचरित्र लिहित होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांतील सूत्रांनी दिली.
लेले माझ्यासाठी वडिलांसारखेच होते. त्यांचे निधन खूपच दुःखदायक आहे. मी कायम त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करीत होतो आणि त्यांचा सल्ला घेत होतो. वयाच्या १२ व्या वर्षापासून ते मला मार्गदर्शन करीत होते, असे माजी क्रिकेटपटू नयन मोंगिया याने श्रद्धांजली वाहताना सांगितले.