भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. (भेल) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या माजी व्यवस्थापकाने येथील अलकापुरी परिसरातील आपल्या निवासस्थानी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सदर माजी व्यवस्थापकाचे नाव एम. पी. अग्रवाल (५९) असे असून दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृतदेह आढळला. स्वेच्छानिवृत्ती पत्करून अग्रवाल हे आपल्या निवासस्थानी एकटेच वास्तव्य करीत होते.
मालमत्तेच्या वादाचा उबग आल्याने आपण आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी अग्रवाल यांनी लिहून ठेवली होती. आपल्या मेव्हण्यांनी इंदूरमधील मालमत्ता विकली आणि आता त्यांनी अलकापुरीतील निवासस्थानही विकण्याचा घाट घातला होता, असेही चिठ्ठीत लिहून ठेवले होते, असे पोलिसांनी सांगितले.
होळीच्या सणानिमित्त अग्रवाल यांच्या भावाने त्यांना दूरध्वनी करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. तेव्हा त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले.
अग्रवाल यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज याच महिन्यात स्वीकारण्यात आला होता, असे भेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आग्रवाल यांचा घटस्फोट झाला होता आणि त्यांना दोन मुले असून एक अमेरिकेत स्थायिक आहे तर दुसरा बंगळुरूमध्ये स्थायिक आहे, असे पोलिसांनी सांगितले.