बिहारचे मावळते डीजीपी गुप्तेश्वर पांडे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दलमध्ये प्रवेश करणार आहेत. नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश करुन गुप्तेश्वर पांडे राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार आहेत. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर लगेचच गुप्तेश्वर पांडे यांचा राजकारणात प्रवेश होत आहे. बिहार निवडणूक लढवण्यासाठी गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं. पण गुप्तेश्वर पांडे यांनी सुरुवातीला आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं म्हटलं होतं. पण नंतर त्यांनी त्यात चूक काय असं म्हणत संकेत दिले होते. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, दुपारी १ वाजता गुप्तेश्वर पांडे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

गुप्तेश्वर प्रकटले!
‘रॉबिनहुड बिहार के’; माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्यावरील गाणं झालं व्हायरल

आयपीएस अधिकारी असलेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी सोमवारी ऐच्छिक सेवानिवृत्ती घोषित केली. त्यानंतर २४ तासांत त्यांच्या निवृत्तीचा निर्णय स्वीकारण्यात आला. कार्यकाळ संपण्यासासठी अवघे पाचच महिने शिल्लक असताना त्यांनी सेवानिवृत्ती स्विकारली. तेव्हाच गुप्तेश्वर पांडे आता राजकारणात येणार असल्याची चर्चा रंगली होती. काँग्रेसने यावरुन भाजपावर निशाणा साधत सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात महाराष्ट्रावर आरोप करण्यासाठी भाजपाने पांडे यांचा वापर केला, त्यानंतर आता त्यांना त्याची बक्षिसी देखील दिली, अशा शब्दांत टीका केली होती.

दरम्यान, काँग्रेसच्या टीकेला उत्तर देताना गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं होतं की, “माझा राजकारणात कोणीही गॉडफादर नाही किंवा माझ्या कुटुंबाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यामुळे हे काहींना पचत नाहीये”.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका करताना या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेनं त्यांच्या जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर रियाची लायकी काढल्यानेही ते वादात अडकले होते.