भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार दिनू सोलंकी यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरटीआय कार्यकर्ता अमित जेथवा यांच्या हत्येप्रकरणी अहमदाबाद सीबीआय न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. दिनू सोलंकी यांच्यासहित सहा जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २० जुलै २०१० रोजी आरटीआय कार्यकर्ता अमित जेथवा यांची गुजरात उच्च न्यायालयाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

६ जुलै रोजी सीबीआय विशेष न्यायालयाने अमित जेथवा यांच्या हत्येप्रकरणी दिनू सोलंकी यांना दोषी ठरवलं होतं. न्यायालयाने याप्रकरणी इतर सहा जणांनाही दोषी ठरवलं होतं. २० जुलै २०१० रोजी गुजरात उच्च न्यायालयाबाहेर दोघांनी गोळ्या घालून अमित जेथवा यांची हत्या केली होती. अमित जेथवा यांनी आरटीआयच्या माध्यमातून गिरच्या जंगलात अवैधरित्या सुरु असलेल्या खननसंबंधी माहिती उघड केली होती. आशियाई सिंहांसाठी गिर जंगल एकमेक निवासस्थान आहे.

सीबीआयने चार्जशीटमध्ये सोलंकीनेच हत्येचा कट रचला असल्याची माहिती दिली होती. गिर जंगलातील अवैध खननसंबंधी माहिती उघड केल्यानेच अमित जेथवा यांची हत्या करण्यात आल्याचं सीबीआयने न्यायालयात सिद्ध केलं होतं. अवैध खननात दिनू सोलंकी यांचाही सहभाग होता. कॉल डेटा रेकॉर्डच्या आधारे पुर्ण तपास करण्यात आला.

हत्येचा तपास याआधी अहमदाबाद डिटेक्शन क्राइम ब्रांचने केला होता. यावेळी त्यांनी चार्जशीटमध्ये सहा जणांच्या नावाचा उल्लेख केला होता. मात्र नंतर या सर्वांना क्लीन चीट देण्यात आली होती. जेथवा यांच्या वडिलांनी यानंतर गुजरात उच्च न्यायालयात धाव घेत योग्य चौकशी केली जावी अशी मागणी केली होती.