स्वामी अग्निवेश यांच्या निधनानंतर समाजमाध्यमांवर औचित्यहिन आणि द्वेषमूलक प्रतिक्रिया व्यक्त केलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे माजी प्रमुख एम. नागेश्वर राव यांच्यावर चौफेर टीका होत आहे. ८१ वर्षीय स्वामी अग्निवेश यांचे शुक्रवारी निधन झाले.

‘नको असलेल्या व्यक्तीपासून सुटका’ अशा शब्दांत राव यांनी ट्विप्पणी केली. अग्निवेश यांचा उल्लेख त्यांनी ‘भगव्या वस्त्रातील हिंदूविरोधी’असा केला. त्यापुढे जात राव यांनी, ‘‘यमराजाबाबत माझी तक्रार आहे. इतकी वाट का पाहायला लावली’’ अशी असभ्य ट्विप्पणी केली.

अनेक नेटकऱ्यांनी राव यांची ट्विप्पणी द्वेषपूर्ण असल्याची टीका करत हिंदुत्वाचा चुकीचा अर्थ लावत असल्याचा टोला लगावला आहे. जातीय राजकारणाचा ठामपणे विरोध करणाऱ्या अग्निवेश यांनी वेठबिगारी संपविण्यासाठी हयातभर प्रयत्न केले. इतिहासकार इरफान हबीब यांनीही राव यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तुमचे वर्तन लाजिरवाणे आहे. उपचार करून घ्या, असा टोला हबीब यांनी समाजमाध्यमांवरील प्रतिक्रियेत लगावला आहे. दिल्लीतील इंडिया पोलीस फौंडेशनने राव यांनी खाकी वर्दीचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. निवृत्त अधिकाऱ्याच्या अशा द्वेष पसरवणारे संदेशांनी देशातील पोलीस दलाचे मनोधैर्य खच्ची होईल, अशी भीती आयपीएफने व्यक्त केली आहे.