सेन्ट्रल बॉर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) अर्थात सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या आगामी ‘रंगीला राजा’ या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने २० कट सुचवले आहेत. मात्र, सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयावर निहलानी भडकले असून त्यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. या सिनेमात गोविंदा प्रमुख भुमिकेत दिसणार आहे.

सुमारे २५ वर्षांनंतर निहलानी गोविंदासोबत सिनेमा करीत आहेत. ‘रंगीला राजा’ असे या सिनेमाचे नाव आहे. मात्र, या सिनेमातील कथीत आक्षेपार्ह दृश्यांमुळे २० कट सेन्सॉर बोर्डाने सुचवले आहेत. यामुळे निहलानी संतप्त झाले असून त्यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

प्रसून जोशी हे अभिनेता आमिर खान यांचे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी आमिरच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमाला एकही कट न सुचवता हिरवा झेडा दाखवला. मात्र, माझा सिनेमा ६० दिवसांपूर्वी सेन्सॉरसाठी पाठवण्यात आला असताना त्यात अनेक कट सुचवण्यात आले. हे मला पटलेले नाही, कारण माझा सिनेमा घाणेरडा नाही किंवा त्यात द्विअर्थी संवादही नाहीत. तरीही मला अनेक संवाद आणि दृश्ये हटवण्यास सांगण्यात आली आहेत.

निहलानी म्हणाले, मी आता सेन्सॉर बोर्डाविरोधात कायदेशीर लढा देणार आहे. प्रसून जोशी नियमांची मोडतोड करीत आहेत. ते आपल्या मित्रांच्या सिनेमांना मुभा देत आहेत. मात्र, मी त्यांच्या पदावर याआधी होतो तरी ते माझी बाजू घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे मी आता जोशींना कोर्टात खेचणार आहे. ही केवळ वैयक्तिक लढाई आहे. मी जेव्हा सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष होतो त्यावेळी अनेक लोक माझ्यावर रागावलेले होते आणि चिंतेत होते. मात्र, आता ते माझ्या सिनेमावर आक्षेप घेत माझ्यावर सुड उगवत आहेत.