मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. बुधवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी काही जुन्या मंत्र्यांसह ४३ मंत्र्यांना शपथ दिली, तर काही मंत्र्यांवर अन्य खात्यांचाही भार देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदीनी आपल्या टीममध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश केला आहे.

आयआयटी कानपूरमधील आयएएस अधिकारी अश्विनी वैष्णव

अश्विनी वैष्णव यांनाही नरेंद्र मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. अश्विन वैष्णव यांनी राष्ट्रपती भवनात सुरू असलेल्या शपथविधी सोहळ्यात मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अश्विन वैष्णव (५०) हे ओडिशाचे राज्यसभेचे खासदार आहेत. १९९४ बॅचचे माजी आयएएस अधिकारी असणाऱ्या अश्विन वैष्णव यांनी १५ वर्षांहून अधिक काळ अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत.

अश्विनी वैष्णव हे त्यांच्या पीपीडी मॉडेलसाठीच्या योगदानाबद्दल ओळखले जातात. त्यांनी बर्‍याच मोठ्या जागतिक कंपन्यांमध्येही मुख्य भूमिका निभावली आहे. जनरल इलेक्ट्रिक आणि सीमेन्स प्रमाणेच कंपन्यामध्ये त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी पेनसिल्व्हेनियाच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीए केले आहे आणि आयआयटी कानपूरमधून एमटेक केले आहे.

चहाच्या मळ्यांमध्ये काम करणारे जॉन बार्ला झाले मंत्री

बुधवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ४३ मंत्र्यांना शपथ दिली त्यामध्ये पश्चिम बंगालच्या जॉन बार्लाचा समावेश आहे. बार्ला यांनी कधीकाळी चहाच्या मळ्यांमध्ये काम केले आहे.

जॉन बार्ला हे पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वारचे लोकसभेचे खासदार आहेत. २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकून ते प्रथमच संसदेत गेले आणि पहिल्यांदाच ते मंत्रीपदापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. चहाच्या बागेत काम करणारे बार्ला यांनी उत्तर बंगाल आणि आसामच्या चहा बागांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या हक्कासाठी बरेच काम केले आहे.

प्राथमिक शाळेतील शिक्षक ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचणारे नितीश प्रामणिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता बरेच नवीन चेहरेही पाहायला मिळणार आहेत. यापैकी एक चेहरा म्हणजे नितीश प्रामणिक जे बंगालच्या राजबंशी समुदायातील आहेत. पश्चिम बंगालच्या कूचबिहार मतदारसंघाचे खासदार नितीश प्रमानिक हे एकेकाळी शिक्षक होते. प्रामणिक प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत होते. ३५ वर्षीय नितीश प्रामणिक यांची बीसीएची पदवी घेतली आहे.

नितीश प्रामणिक यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात तृणमूल काँग्रेसपासून केली होती. तृणमूलमध्ये सुरुवातीला ते युवा नेते म्हणून काम पाहत होते. त्यानंतर २०१८ मध्ये ते तृणमूलमधून बाहेर पडून अपक्षपणे निवडणुकीत उभे राहिले होते आणि निवडणूनही आले होते. त्यानंतर भाजपाने २०१९ मध्ये त्यांनी लोकसभेचे तिकीट दिले होते. कूचबिहार लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते.

पोलीस उपनिरीक्षक होते सत्यपाल सिंह बघेल

बऱ्याच प्रतीक्षेनंतर मोदींच्या मंत्रिमंडळात आग्रा लोकसभेचे खासदार सत्यपाल सिंह बघेल यांना जागा मिळाली आहे. यामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा आनंद झाला आहे. राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची धुरा सांभाळून खासदारकी निवडणूक जिंकणार्‍या एस.पी.सिंह बघेल यांना मंत्रिपद मिळण्याचा अंदाज होता पण त्यांना मंत्रिपदासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली होती. बुधवारी त्याची घोषणा झाली. एसपी सिंह बघेल यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.  त्यांनी बुधवारी संध्याकाळी ११ व्या क्रमांकावर मंत्रीपदाची शपथ घेतली.

मोदी सरकारमध्ये मंत्री बनणारे प्राध्यापक एस.पी.सिंग बघेल यांची राजकीय कहाणी अत्यंत रंजक आहे. उत्तर प्रदेश पोलिसात सब इन्स्पेक्टर म्हणून एसपी सिंह बघेल हे आज राजकीय जगातील एक मोठे नाव आहे. उत्तर प्रदेश पोलिसात असताना मुलायमसिंह यादव यांच्या सुरक्षा ताफ्यात ते होते आणि येथूनच त्यांचे नशिब बदलू लागले. तेलोकसभा व राज्यसभेचे खासदार होते. २०१७ मध्ये टुंडला येथून विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले. त्यानंतर भाजपाने त्यांना आग्रा लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले एस.पी.सिंग बघेल यांनी येथे विजय नोंदविला.