गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना लुइस बर्जर प्रकरणी आपल्यासमोर लाच देण्यात आली, असा दावा सध्या अटकेत असलेल्या एका माजी अधिकाऱ्याने भर न्यायालयात केल्याने कामत यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
जपान इंटरनॅशनल को-ऑप. एजन्सीने हाती घेतलेल्या गोव्यातील जलप्रकल्पाचे माजी संचालक ए. वाचासुंदर यांनी ही धक्कादायक कबुली न्यायदंडाधिकारी बी. पी. देशपांडे यांच्यासमोर दिली. माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव आणि कामत यांना लाचेची रक्कम आपल्या पुढय़ातच देण्यात आल्याचा दावा वाचासुंदर यांनी केला, असे गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. कामत आणि आलेमाव यांना लाच कशा प्रकारे देण्यात आली, कोठे देण्यात आली आणि किती पैसे देण्यात आले त्याचे वाचासुंदर यांनी दंडाधिकाऱ्यांसमोर सादरीकरण केले, असेही अधिकाऱ्याने सांगितले. कामत यांना अनेकदा लाच दिल्याचेवाचासुंदर म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.