राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले आहे. राज्य सरकारने एक दिवस राज्यात शोक जाहीर केला आहे. माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांना करोनाचा संसर्ग झाला होता. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पहाडिया यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

गेहलोत यांनी ट्वीट केले की, ‘राज्याचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. पहाडीया यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री म्हणून दीर्घकाळ देशाची सेवा केली. ते देशातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये होते.’ गेहलोत यांच्या म्हणण्यानुसार, पहाडीया करोनामुळे आमच्यातच राहिले नाहीत. त्यांच्या मृत्यूने मला धक्का बसला. तसेच माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे.

पहाडिया यांच्या मृत्यूवर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला

पहाडिया यांच्या मृत्यूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. मोदी यांनी ट्वीट केले की, “राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांच्या निधनाने मला दु: ख झाले आहे. आपल्या दीर्घ राजकीय आणि प्रशासकीय कारकीर्दीत त्यांनी सामाजिक सबलीकरणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रती संवेदना”

अधिकृत प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, २० मे रोजी (गुरुवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. दुपारी १२ वाजता माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांच्या निधनामुळे शोकसभा होणार आहे. पहाडिया यांच्या सन्मानार्थ राज्यात शोक दिवस आणि राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर झुकलेला असेल, २० मे रोजी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सुट्टी असेल. पहाडिया यांच्यावर राज्य सन्मान देऊन अंत्यसंस्कार केले जातील.