कर्नाटकमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यानंतर आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरवरून करोना झाल्याची माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्या लोकांना करोना चाचणी करण्याची विनंती करत आयसोलेट होण्यास सांगितलं आहे.

‘माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी करोना चाचणी करुन घ्यावी, तसेच स्वत:ला आयसोलेट करावं अशी विनंती करतो’, असं ट्वीट एचडी कुमारस्वामी यांनी केलं आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनाही दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ७८ वर्षीय बीएस येडियुरप्पा यांना गेल्या वर्षीही करोनाची लागण झाली होती. ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या मुलीलाही करोना झाल्यानं रुग्णालयात भरती केलं होतं. योग्य उपचाराअंती दोघांनी करोनावर मात केली आणि त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं.