कोळसा घोटाळाप्रकरणी दोषारोप निश्चित झालेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना येत्या १६ डिसेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तत्पूर्वी आपली शिक्षा कमी करण्यात यावी अशी याचना त्यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडे केली आहे. आपल्याला दोन लहान मुली आहेत, तसेच आरोग्यासंबंधीच्या समस्यांनीही आपल्याला ग्रासल्याने याचा गांभीर्याने विचार करण्यात यावा असे कोडा यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील इतर तीन दोषींनी देखील आरोग्याचे कारण सांगत शिक्षेत सूट देण्याची याचना न्यायालयाकडे केली आहे.


कोळसा घोटाळा प्रकरणी सीबीआय कार्टाने मंगळवारी माजी मुख्यमंत्री कोडा यांना दोषी ठरवले होते. आज त्यांना शिक्षा सुनावली जाणे अपेक्षित होते. मात्र, न्यायालयाने याची सुनावणी शनिवार (१६ डिसेंबर) पर्यंत पुढे ढकलली.

मधू कोडा यांच्याबरोबर माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, झारखंडचे माजी मुख्य सचिव अशोककुमार बसू यांना दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणात आणखी दोन लोक आहेत ज्यांना या प्रकरणात शिक्षा मिळणार आहे. या सर्वांना कलम १२० ब अंतर्गत गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. याआधीही निवडणूक आयोगाने मधू कोडा यांना दणका देत निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब न दिल्याप्रकरणी कडक कारवाई केली होती. तीन वर्षे मधू कोडा निवडणूक लढवू शकणार नाहीत, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते.

झारखंडमधील कोळसा खाण वाटपात कोलकात्यातील ‘विनी आयर्न आणि स्टील कंपनी’ला नियमबाह्य पद्धतीने खाण वाटप केल्याचे कोडा आणि इतर सनदी अधिकाऱ्यांवरील आरोप सिद्ध झाले आहेत. या कंपनीला झारखंडमधील राजहरा इथल्या कोळसा खाणी देण्यात आल्या होत्या.