“पक्षामध्ये गटबाजी सुरू असून काँग्रेसमध्ये काम करणं आता अवघड झालं आहे”, असं म्हणत बाहेर पडलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार पी. सी. चाको आठवड्याभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. केरळ विधानसभा निवडणुकांसाठी महिन्याभरात मतदान होणार असून त्या पार्श्वभूमीवर चाकोंनी ‘पक्षात काम करणं अवघड झालंय’, असं म्हणून बाहेर पडणं हा काँग्रेससाठी केरळमध्ये मोठा फटका मानला जात होता. मात्र, आत चाको हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच पर्यायाने डावेप्रणीत लेफ्ट डेमॉक्रेटिक फ्रंटमध्ये दाखल झाल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेससमोर चाकोंना समजून रणनीती आखण्याचं आव्हान असणार आहे. मंगळवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पी. सी. चाको यांनी आपला निर्णय पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केला आहे.

 

मी पुन्हा LDF मध्ये…!

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना चाको यांनी आपण पुन्हा एलडीएफचे घटक झालो असल्याचं सांगितलं. “मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा केरळमध्ये एलडीएफचाच घटकपक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी एलडीएफचा घटक झालो आहे”, असं ते म्हणाले.

“काँग्रेससाठी काम करणं अवघड झालंय”; चाको यांनी सोनियांना पाठवला राजीनामा

सकाळपर्यंत ठरलं नव्हतं!

चाकोंच्या दृष्टीने मंगळवारचा दिवस घडामोडींचा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावं की माकपमध्ये जावं, हे अंतिम क्षणापर्यंत त्यांनी निश्चित केलेलं नसल्याचं त्यांच्या सकाळच्या विधानावरून दिसून येत होतं. “मी शरद पवारांची भेट घेणार आहे. पक्षाला ज्या काही संकटातून जावं लागत आहे, त्यावर चर्चा करणं आवश्यक आहे. मी सिताराम येचुरी आणि गुलाम नबी आझाद यांना देखील भेटणार आहे. त्यानंतर पुढचं पाऊल काय असावं, हे ठरवेन. मला एलडीएफला माझा पाठिंबा द्यायला हवा पवारसाहेबांची भेट घेतल्यानंतर पक्षप्रवेशाविषयी मी ठरवेन”, असं चाको म्हणाले होते.

 

मात्र, अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचीच निवड करून पक्षप्रवेश केला आहे.