माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीतून खासदार म्हणून निवडून आलेल्या गौतम गंभीरने गुरुग्रामची घटना खेदजनक असल्याचे म्हटले आहे. पुन्हा असे कोणी करण्याची हिम्मत करु नये यासाठी इतरांच्या मनात धाक निर्माण होईल अशी कारवाई प्रशासनाने करावी अशी मागणी गौतम गंभीरने केली आहे. गुरुग्राममध्ये काही अज्ञात तरुणांनी एका मुस्लीम युवकाला टोपी काढायला लावून जय श्री रामची घोषणा द्यायला सांगितली. या मुस्लीम युवकाला मारहाण करण्यात आली. गौतम गंभीरने या घटनेचा विरोध केला आहे.

गौतम गंभीरने आपल्या टि्वटमध्ये भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे हे सांगताना प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी लगान चित्रपटासाठी लिहिलेल्या “ओ पालन हारे, निर्गुण और न्यारे” आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या दिल्ली-६ चित्रपटातील “अर्ज़ियाँ” गाण्याचे दाखला दिला आहे.

पारंपारिक मुस्लीम टोपी घातली म्हणून एका २५ वर्षीय मुस्लीम युवकाला चार अज्ञात तरुणांनी मारहाण केली. आलम याने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, सदर बाजार परिसरात काही अज्ञात तरुणांनी त्याला घेरलं आणि घातलेल्या पारंपारिक टोपीवर आक्षेप घेतला. ‘आरोपींनी मला धमकावलं. या परिसरात टोपी घालण्याची परवानगी नाही असं सांगू लागले. त्यांनी माझी टोपी काढली आणि कानाखाली लगावली. यावेळी त्यांनी मला भारत माता की जय अशी घोषणा देण्यासही सांगितलं’, अशी माहिती आलमने दिली आहे.