दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दि.२१) दिल्लीच्या निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय क्षेत्रातील अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती.

दरम्यान, रविवारी सकाळी साडे अकरा वाजता निजामुद्दीन येथील निवासस्थानी शीला दीक्षित यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्यालयात नेण्यात आले. यावेळी राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील हजारो लोकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आदी दिग्गज नेत्यांनी यावेळी शीला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली.

शीला दीक्षित यांचा जन्म ३१ मार्च १९३८ मध्ये पंजाबच्या कपूरथला येथे झाला होता. त्यांनी दिल्लीच्या कॉन्व्हेट ऑफ जीजस अॅण्ड मेरी स्कूलमधून शिक्षण घेतले होते. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर पहिल्यांदा त्या १९८४मध्ये उत्तर प्रदेशच्या कन्नौज लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्या दिल्लीच्या राजकारणात सक्रीय झाल्या. त्यानंतर त्या पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून २००४ ते २०१४ पर्यंत खासदार राहिल्या. नुकतेच त्यांनी उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.