माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री कार्डिअॅक अरेस्टने निधन झआले. त्यांनी दिल्लीतील एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकारण्यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच इस्त्रायनेही शोक व्यक्त केला आहे.

भारत आणि इस्त्रायल यांच्या द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी सुषमा स्वराज यांनी दिलेले योगदान कधीही न विसरण्यासारखे असल्याचे इस्त्रायलने आपल्या इस्त्रायल इन इंडिया ट्विटर हँडलवरून म्हटले आहे. तसेच या ट्विटमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि सुषमा स्वराज यांचा एक फोटोही ट्विट केला आहे. तसेच अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्रमंत्र्यांनीही सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीदेखील सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुषमा स्वराज आणि आपले उत्तम संबंध होते. त्यांच्या निधनाने आम्ही चांगला मित्र गमावला असल्याचे शेख हसीना म्हणाल्या. तर इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद झरीफ यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत सुषमा स्वराज या आपल्या प्रिय भगिनी होत्या असं म्हटलं आहे. तसेच रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानेही त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. भूतानच्या पंतप्रधानांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत भारत दौऱ्यादरम्यान सुषमा स्वराज यांची भेट घेण्याचे भाग्य लाभल्याचे म्हणाले. तसेच भूतान आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी असलेले त्यांचे योगदान कायम लक्षात राहिल, असे म्हटले आहे. तर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनीही त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.