तीन वेळा फॉर्म्युला वन चॅम्पिअन राहिलेले महान खेळाडू निकी लॉडा यांचे सोमवारी (दि.२०) निधन झाल्याचे वृत्त आहे, ते ७० वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते, लॉडा यांच्या कुटुंबियांच्या हवाल्याने एएफपी या वृत्तसंस्थेने याबाबत वृत दिले आहे.

शीतज्वराचा त्रास होऊ लागल्याने या वर्षी जानेवारी महिन्यात १० दिवसांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते किडनीच्या आजाराने अधिकच त्रस्त होते. लॉडा यांच्यावर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यांत दोनदा यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही झाली होती. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली होती. दरम्यान सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

फॉर्म्युला वन (F1) स्पर्धेमध्ये त्यांनी तीन वेळा विजेतेपद पटकावले होते. फेरारीसाठी १९७५, १९७७ आणि मॅकलॅरेनसाठी त्यांनी १९८४ मध्ये विजेतेपद पटकावले होते. १९७६ मध्ये स्पर्धेदरम्यान लॉडा यांच्या कारला मोठा अपघात झाल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर मात्र, ते एअरलाइन आंत्रप्रन्युअर म्हणून नावारुपाला आले.