साधारण महिनाभरापूर्वीच माझी अरुण जेटली यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी बोलताना त्यांनी काही टिपण्या केल्या, त्यातून आपोआप त्यांचे वेगळेपण सिद्ध होत गेले. ‘आपण जेव्हा पदावर होतो तेव्हा नेहमीच इतरांना मदत केली. त्यातून इतरांच्या सदिच्छा मला मिळत गेल्या.’ (पण सध्या विरोधी पक्षनेतेच कठीण कायदेशीर अडचणीत सापडले, पण त्यांच्या मदतीला कुणी मित्र धावून आले नाहीत.)

जेटली (वय ६६) यांचा सहवास ज्यांना लाभला त्यांची आयुष्ये मंतरल्यागत बदलून गेली. न्यायालये, संसद, क्रिकेट संघटना, माध्यमे, लोधी गार्डन्स, व्यापार, भाजप कार्यालय अशा अनेक ठिकाणचे लोक त्यांच्या संपर्कात कधी ना कधी आले. त्यांना त्यांचे प्रेम अनुभवायला मिळाले, त्यांचेच डोळे ओलावले नसते तरच नवल. सरकारविरोधात अनेक दावे लढणाऱ्या एका वकिलाने आज माझ्याजवळ प्रांजळ भावना व्यक्त केल्या, ते म्हणाले की, राजकारणातला शेवटचा चांगला माणूस आपल्याला सोडून गेला आहे..

जेटली कुणालाही मदतीसाठी तत्पर असत, हा औदार्याचा गुण त्यांच्यात जन्मत: असावा. ज्या लोकांना त्यांनी घडवले ते आज सरकारमध्ये वेगवेगळ्या पदांवर आहेत. त्यांचे कायदा क्षेत्रातील जुने कनिष्ठ सहकारी आता एका वेगळ्या उंचीवर आहेत. त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुले त्यांच्या त्यांच्या व्यवसायात चांगले काम करीत आहेत. या सगळ्यात त्यांचे औदार्य व उत्तेजन यांचा मोठा हातभार होता. किंबहुना दुसऱ्यांच्या आनंदातच त्यांनी आनंद मानला.

१९९० च्या सुमारास दिल्लीत नरेंद्र मोदी हे फारशी कुणाला ओळख नसलेले पक्षाचे साधे सरचिटणीस होते, तेव्हाच जेटली यांनी त्यांच्यातील गुण ओळखले होते. २०१० मध्ये अमित शहा यांना गुजरातमधून काही काळ हद्दपार करण्यात आले होते, तेव्हा ते संसदेत जेटली यांच्या कार्यालयातील एका कोपऱ्यात बसत असत. अगदी शेवटपर्यंत जेटली पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या संपर्कात होते. नव्या मंत्रिमंडळात पद स्वीकारण्यास त्यांनी प्रकृतिअस्वास्थ्याने नकार दिला होता. ते पक्षाचे सदस्य होते, त्यांचे विरोधक त्यांना भलेही संकुचित समजत होते, तरी ते उदार मानवतावादी होते. भिन्न मते ते सहज ऐकून घेत असत. एकदा मी त्यांना म्हटले की, वृत्तपत्रातील ताज्या छायाचित्रात भगवा फेटा घातलेल्या स्थितीत तुम्ही अवघडलेले दिसता आहात. त्यावर ते म्हणाले की, हो, तू म्हणतेस ते खरे आहे. भगवा फेटा घालून जरा अवघडल्यासारखे वाटले हे नक्की. जेव्हा २०१७ मध्ये राज्यसभा निवडणुकीवेळी अहमद पटेल त्यांच्याविरोधात जेटली उमेदवार होते तेव्हाच्या वादात अनेकांनी निष्ठा सिद्ध करण्याचे प्रयत्न केले. भाजपने धाकदपटशाही केल्याच्या चर्चा होत्या, तेव्हा एका पत्रकाराने त्यांना विचारले की, तुम्ही कुणाच्या बाजूने आहात. ते म्हणाले, मी लोकशाहीच्या बाजूने आहे. त्यांच्या या मृदू शब्दांनी भाजपची कठोरता अनेकदा सुसह्य़ केली. त्यांच्याविना असलेल्या सरकारमध्ये आता ते वेगळेपण कधीच असणार नाही.

पक्षभेद विसरून त्यांचे अनेक मित्र होते. प्रणब मुखर्जी जेव्हा यूपीए सरकारमध्ये अर्थमंत्री होते, तेव्हा त्यांनी आयडिया एक्स्चेंज कार्यक्रमात सांगितले होते की, विरोधी पक्षातील एकच व्यक्ती प्रशंसेस पात्र आहे, ती म्हणजे जेटली. त्या वेळी जेटली राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. विद्यार्थी नेते म्हणून जेटली हे जयप्रकाश यांच्या आंदोलनातील बिहारचे लालूप्रसाद यादव व नितीशकुमार यांच्याजवळ होते. त्या चळवळीतील ते सर्व समकालीन. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे व राजीव शुक्ला हे त्यांचे कौटुंबिक मित्र. अमरिंदर सिंग यांनी अमृतसर लोकसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये जेटली यांचा पराभव केला, पण ते नेहमी संपर्कात असत. अकाली दलातील बादल कुटुंबीयांशी त्यांचे वेगळे सख्य होते. त्यांच्या संपर्काचा खूप फायदा पक्षाला युती, आघाडय़ा यासाठी झाला. राजकीय समझोते त्यांनी घडवून आणले. अनेक वेळा त्यांनी राजकीय भांडणे मिटवली. २०१७ मध्ये राष्ट्रपती म्हणून प्रणब मुखर्जी यांनी निरोपाचे जेवण ठेवले होते. त्या वेळी लालू यादव हे जनता दल संयुक्त हा तुमचा पक्ष फोडण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती जेटलींनी नितीशकुमार यांना दिली व त्याबदल्यात बिहारमध्ये जनता दल संयुक्त व भाजप यांची युती घडवून आणली.

ते माध्यमांचे नेहमीच लाडके होते. संसदेतील प्रतिनिधी नेहमी ते संसद भवनात दुपारच्या वेळी कधी येतात याची वाट बघत असायचे. काही तरी चटपटीत विनोदी गोष्टी अशा वेळी ठरलेल्या असत. त्यांचे अनेक क्षेत्रांत सदिच्छुक होते, त्यामुळे त्यांचे माहितीचे जाळे अफाट होते. कुठल्याही समारंभात ते नेहमी आकर्षण केंद्र असत. लोधी गार्डन असो की कुठली पार्टी; त्यात त्यांची उपस्थिती दिलखेचक होती. लोकांची जी माहिती त्यांच्याजवळ होती ती चकित करणारी होती. त्यांची स्मृती तल्लख असल्याने ते कुणालाही सहज ओळख देत. खान मार्केट ही संकल्पना त्यांनी रूढ केली. त्यातून  त्यांची विनोदबुद्धी व खोचकता स्पष्ट होते. कायदा क्षेत्रातही त्यांचे अनेक मित्र होते. त्या मित्रांनी २०१४ मध्ये अमृतसर येथील निवडणुकीत जेटली यांच्या प्रचारासाठी वेळ काढला.

मोदी यांच्या २०१४ मधील पहिल्या कार्यकाळात जेटली हे विरोधकांशी संपर्काचे मोदी यांचे खंदे विश्वासू होते. माध्यमे, कायदा या क्षेत्रांतील त्यांचा संपर्कही मोदींना उपयोगी आला. सरकारी नेमणुका करताना नामवंत व्यक्तींचा गोतावळा जमा करण्यात त्यांनी मोदींना मदत केली. मोदी यांचाही जेटलींवर मोठा विश्वास होता. अर्थ, व्यापार, संरक्षण ही महत्त्वाची खाती त्यामुळेच त्यांच्याकडे आली, नंतर माहिती प्रसारण खातेही त्यांनी सांभाळले.

जेटली यांच्याशी माझी पहिली भेट ही १९७३ मध्ये इंदिरा गांधी यांच्या राजवटीवेळी झाली. त्या वेळी मी शिकाऊ वार्ताहर होते व अभाविप नेत्याच्या (जेटली) विजयाच्या वार्ताकनासाठी गेले होते. त्यांनी त्या वेळी एनएसयूआयचे पंकज व्होरा (आता पत्रकार) यांचा दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटना निवडणुकीत पराभव केला होता. त्या काळात काँग्रेस संघटनेचा वरचष्मा असताना हा मोठा विजय होता. जेटली यांची शैक्षणिक कारकीर्दही चमकदार होती. श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सचे त्या वेळी ते विद्यार्थी होते. विद्यार्थी नेते म्हणून जयप्रकाश यांच्या आंदोलनात जेटली यांनी मोठी भूमिका पार पाडली. जेव्हा २६ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर झाली तेव्हा त्यांना अटक करण्याचे वॉरंट निघाले. ते पोलिसांच्या तावडीतून पळाले व घराच्या भिंतीवरून उडी मारली. त्याच दिवशी त्यांनी इंदिरा गांधी यांच्याविरोधात दिल्ली विद्यापीठात सभा घेतली. नंतर १९ महिने ते तुरुंगात होते, पण त्यामुळे त्यांचे मनोधैर्य खचले नाही. तुरुंगातही तुम्ही तुमचे जग निर्माण करू शकता. जर तुम्ही विचारी असलात तर तुम्ही नाउमेद होण्याचे काही कारण नसते, असे ते मला म्हणाले होते. तुरुंगात त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू ठेवला व दुसरे वर्ष उत्तीर्ण झाले. विरोधी पक्षातील अनेक मित्र त्यांना मिळाले. माझा नवरा वीरेंद्र कपूर हा मिसा बंदीच होता, तोही त्यांना तेथेच भेटला व ते जिवाभावाचे मित्र झाले.

निवडणुकीनंतर जनता सरकार १९७७ मध्ये सत्तेवर आले. जेटली यांनी कायद्याची पदवी घेतली व वकील म्हणून काम सुरू केले. इंडियन एक्स्प्रेसचे मालक रामनाथ गोयंका यांनी जेटली यांना विधि सल्लागार नेमले होते. १९८० मध्ये एक्स्प्रेस गांधी सरकारविरोधात अनेक आघाडय़ांवर लढत असताना ते नेहमी एक्स्प्रेसच्या इमारतीत येत असत. ही इमारतच पाडण्याची धमकी सरकारने दिली होती. त्या वेळी त्यांनी सत्तेविरोधात लढा दिला व तसे काही होऊ दिले नाही. एक्स्प्रेसने सरकारविरोधात कायदेशीर पातळीवर आक्षेपार्ह काही लिहिलेले नाही हे त्यांनी पटवून दिले.

१९८९ मध्ये विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाले, तेव्हा जेटली यांना मोठी संधी मिळाली. त्यांना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नेमण्यात आले. त्या वेळी जेटली ३६ वर्षांचे होते. बोफोर्स चौकशीत जेटली यांचा मोठा वाटा होता. नंतर अटलबिहारी वाजपेयी सरकारने त्यांना १९९९ मध्ये मंत्रिपद दिले. जेटली यांना पदे केवळ हवी होती म्हणून मिळाली नाहीत. कारण सुरुवातीला ते अडवाणींचे समर्थक मानले जात होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आशीर्वाद असलेले प्रमोद महाजन हे त्यांचे स्पर्धक होते. पण कायदा, माहिती व प्रसारणमंत्री म्हणून जेटली यांनी ठसा उमटवला. सत्ता गेल्यानंतर ते पक्षाचे सरचिटणीस व प्रवक्ते असूनही त्यांनी वकिली सुरू केली. देशातील ते उत्तम वकील होते. त्यांचे कनिष्ठ सांगतात त्याप्रमाणे त्यांची स्मरणशक्ती व आकलन फार जबरदस्त होते. एका मिनिटात ते कुठलेही प्रकरण समजून घेत. २००९ मध्ये ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते बनले. त्यासाठी त्यांनी पदराला खार लावून हे काम पत्करले. पण पैसा त्यांना सर्वस्व नव्हते. त्यांना महागडे पेन, घडय़ाळे, शाली यांचा छंद होता. अमृतसरी मासे त्यांना आवडत. केजरीवाल यांनी त्यांच्यावर दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेत गैरप्रकार केल्याचा आरोप केला, पण नंतर त्यांना माफी मागावी लागली.

मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाले तेव्हा जेटली मंत्री होणार हे उघड होते. कारण सुरुवातीपासून मोदींना पाठिंबा देण्यात जेटली आघाडीवर होते. अर्थमंत्री म्हणून त्यांनी जीएसटीचे शिवधनुष्य पेलले. उदारीकरणानंतरची ती सर्वात मोठी आर्थिक सुधारणा होती. त्यांच्या कायदेशीर पाश्र्वभूमीमुळे त्यांचे विविध पक्षांत चांगले संबंध होते, त्यामुळे अनेक विधेयकांवर त्यांनी समझोते घडवले. पक्षांतरबंदी विधेयक, तिहेरी तलाक विधेयक ही त्याची काही उदाहरणे. दुर्दैवाने जेटली यांची प्रकृती ते २०१४ मध्ये मंत्री झाल्यानंतर बिघडत गेली. पण त्यांनी आजाराशी धैर्याने झुंज दिली. त्यांना ज्या वेदना सहन कराव्या लागल्या त्या त्यांनी जगासमोर न आणता हसतमुख राहिले. शेवटपर्यंत ते आशावादी होते. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात कधी भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.       – कुमी कपूर, लेखिका दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत.