अरुण जेटली हे राजकीय वर्तुळात एक बुद्धिवादी नेते म्हणून ओळखले जात होते. विनयशील, स्पष्टवक्ते व धोरणी हे त्यांचे विशेष गुण. ल्युटेन्सशी असलेल्या त्यांच्या संबंधांचा फायदा मोदी व शहा यांना नेहमीच मिळाला. मोदी यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती.  २००२ पासून जेटली हे भाजप आणि सरकारचे संकटमोचक होते. अमित शहा यांना गुजरातमधून बाहेर पाठवल्यानंतर जेटली यांनी त्यांना मदत केली होती. मोदी यांना २०१४ मध्ये भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले त्याच्या काही महिने आधी जेटली यांनी राजनाथ सिंह, शिवराज सिंह चौहान व नितीन गडकरी यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. मोदींचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. जेटली हे निष्णात वकील होते. अटलबिहारी वाजपेयी मंत्रिमंडळात त्यांनी काम केले. मोदी यांनी त्यांचे वर्णन मौल्यवान हिरा असे एकदा केले होते. नंतर त्यांनी जेटली यांच्यावर अर्थमंत्रिपदाची  धुरा सोपवली. त्या वेळी अरुण शौरी, सुब्रह्मण्यम स्वामी यांना दूर ठेवण्यात आले. मनोहर पर्रिकर आजारी असताना त्यांना संरक्षणमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला. जेटली यांनी १९९० पासून भाजपला अनेक संकटांतून बाहेर काढले. २०१४-२०१९ या मोदींच्या पहिल्या कारकीर्दीत जेटली यांनी मंत्रिपदावर काम करतानाच काँग्रेसचे अनेक हल्ले चपखल युक्तिवादांनी परतवले. २०१९ मधील निवडणुकीत स्थिरता विरुद्ध गोंधळ असे चित्र निर्माण करण्यात पडद्यामागून जेटली यांनी सूत्रे हलवली. इंधन दरवाढ, राफेल लढाऊ विमानांचा करार या गोष्टी त्यांनी सोप्या भाषेत लोकांपर्यंत नेल्या. दोन दशके रेंगाळलेला वस्तू व सेवा कर कायदा अमलात आणण्याची अवघड कामगिरी त्यांनी केली. तिहेरी तलाकवर सरकारची बाजू हिरिरीने मांडण्यात ते आघाडीवर होते. भाजप सरकारचे ते राजकीय धोरणकार होते. महागडे पेन, घडय़ाळे व आलिशान मोटारी, शाली यांच्या संग्रहाची त्यांना आवड होती. मवाळ स्वभावाचे जेटली यांचे सर्व राजकीय वर्तुळात मित्र होते. सार्वजनिक पातळीवर एक सभ्यतेची संस्कृती त्यांनी अनुसरली. मतभेद असले तरी त्यांनी कधी आक्रस्ताळेपणा केला नाही. निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, धर्मेद्र प्रधान हे त्यांच्या मुशीत घडले. पक्षाचे प्रवक्ते त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय बोलत नसत. पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांना ‘महा धोरणकार’ म्हटले होते. २०१४ मध्ये जेटली यांनी अमृतसरमधून निवडणूक लढवली होती. त्या वेळी प्रचारसभेत मोदी यांनी जेटली यांचे वर्णन ‘अमूल्य हिरा’ असे केले होते. जेटली यांना अमृतसरचे छोले व कुलचा फार प्रिय होते. दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील बारीकसारीक गोष्टींची खबर त्यांच्याकडे असे. प्रसारमाध्यमांचे ते फार लाडके. मोकळेपणाने ते पत्रकारांशी बोलत. काही वेळा इतके सरळ व स्पष्टवक्ते वागत की अनेकांना आश्चर्य वाटत असे. मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असताना त्यांना १९९० च्या सुमारास दिल्लीत सरचिटणीस नेमण्यात आले तेव्हा ते जेटली यांच्या ९ अशोका रोड येथील अधिकृत बंगल्यात वास्तव्यास होते. गुजरातचे मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांना हटवून मोदी यांना मुख्यमंत्री करण्यात जेटली यांचा मोठा वाटा होता. मोदी यांच्याविरोधात गुजरात दंगलीनंतर जे वादळ उठले त्यात जेटली त्यांच्या पाठीशी राहिले. लाहोरमधून फाळणीच्या वेळी भारतात आलेल्या स्थलांतरित वकिलाचे पुत्र असलेल्या जेटली यांनी वकिलीचा अभ्यास केला व नंतर दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले त्या वेळी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली. जेटली यांना विद्यापीठात मोर्चे काढल्याने १९ महिने तुरुंगवास पत्करावा लागला. आणीबाणीनंतर त्यांनी पुन्हा वकिली व्यवसाय सुरू केला. दिल्लीचे तेव्हाचे (१९८०) नायब राज्यपाल जगमोहन यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ची इमारत पाडण्याचा आदेश दिला होता. त्या वेळी त्यांच्या त्या निर्णयास जेटली यांनी आव्हान दिले. त्यामुळे जेटली हे रामनाथ गोयंका, अरुण शौरी व फाली नरिमन यांचे निकटवर्ती बनले. त्यातूनच विश्वनाथ प्रताप सिंह यांच्याशी त्यांचा परिचय झाला. विश्वनाथ प्रताप सिंह पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी जेटली यांना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नेमले. या पदावरचे ते सर्वात तरुण व्यक्ती होते.  राष्ट्रीय लोकशाही आघाडी १९९९ मध्ये प्रथम सत्तेवर आली तेव्हा वाजपेयी मंत्रिमंडळात जेटली मंत्री झाले. नंतर त्यांनी माहिती व प्रसारण, निर्गुतवणूक, जहाजबांधणी, उद्योग ही खाती सांभाळली.