|| अ‍ॅड. आशीष शेलार

राजकीय विषयावर किंवा राजकीय आवश्यकतेपोटी पक्षाची किंवा सरकारची भूमिका समजण्यासाठी एक आगळीवेगळी भूमिका आणि मांडणी हे प्रत्येकाला जमतेच असे नाही. ते काही जणांना जमते त्यांतील अग्रणी नेते अरुण जेटली होते.

तो दिवस आजही मला आठवतो- २३ फेब्रुवारी २०१७.. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल हाती येण्यास सुरुवात झाली होती. मी मुंबई भाजपच्या कार्यालयात टीव्ही लावून एकटाच बसलो होतो. कुणालाही पूर्ण निकाल लागल्याशिवाय भेटणार नाही, असे सांगून मी कोंडूनच घेतले होते. ही निवडणूक आमच्यासाठी वेगळी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वबळावर प्रथमच मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली होती. निकाल जसे जसे हाती यायला लागले त्या वेळी टीव्हीवरील आकडे आणि प्रत्यक्षातील आकडे यात तफावत होती. टीव्हीवरील आकडे पाहून प्रथम मला अमितभाईंचा फोन आला, क्या होगा आशीष, असा प्रश्न त्यांनी विचारला. मी वास्तव आकडेवारी सांगितली. त्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री असलेल्या अरुण जेटली यांचा फोन आला. त्यांनीही विचारले, क्या होगा आशीष.. मी म्हटले, सर, प्रत्यक्षातील आकडे आणि टीव्हीवरील आकडे वेगळे आहेत. मला वाटते तुल्यबळ निकाल येतील. त्यांनी अन्य चर्चा केली आणि फोन ठेवला. ही निवडणूक मुंबई महापालिकेची होती, त्यामुळे देशासाठी तशी महत्त्वाची नव्हती. तरीही या राष्ट्रीय नेतृत्वांकडून देवेंद्रजी आणि आमच्यासाठी येणारे फोन धीर देणारे होते, आपलेपणाचे होते. निकाल जसजसे पुढे सरकत होते तसतशी उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर निकाल काय आले ते सर्वाना ज्ञात आहे. भाजपला तुल्यबळ यश मिळाले. हे यश घवघवीत होते. त्यानंतर पुन्हा अभिनंदनाचे फोन मला येऊ लागले. त्यात अरुणजींचाही फोन आला. ते म्हणाले, आशीष, तुम्हारा अंदाज परफेक्ट निकला. अरुणजी भाजपच्या यशाबद्दल खूश होते. म्हणाले, आवो दिल्ली. मं तुम्हे ट्रीट दुंगा.. त्यानंतर त्यांच्या कामाची गडबड, प्रकृती, आजारपण यांमुळे ही भेट राहून गेली, त्याची आज खंत वाटते. तसे आम्ही त्यानंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटलो. पण ही ट्रीटवाली भेट राहून गेली ती गेलीच.

अरुणजी जेटली यांना मी पहिला भेटलो तो कॉलेजच्या दिवसांत. १९९०-९१चा काळ असावा. मी कॉलेजचा विद्यापीठ प्रतिनिधी होतो आणि आम्ही विद्यापीठ निवडणुकांची तयारी करीत होतो. अशा वेळी आमच्या विचाराने चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी चळवळीची दिशा, देशाचे प्रश्न, महाविद्यालयीन प्रश्न.. अशा विषयांवर चर्चासत्र आम्ही आयोजित केले होते. त्यामध्ये उद्घाटक म्हणून कुणाला बोलवावे असा विचार जेव्हा समोर आला त्या वेळी सर्वानुमते अरुणजींचे नाव पुढे आले. त्या वेळी ते वकिलीचा व्यवसाय करीत होते. दिल्लीहून आमच्या एवढय़ा छोटय़ा कार्यक्रमाला ते येतील का, असा प्रश्न होता, पण आमचे आमंत्रण त्यांनी स्वीकारले आणि ते आले. त्या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थिदशेतील आमच्या विचारांचा कार्यकर्ता, देशासमोरचे प्रश्न अशा एकूणच विषयाची मांडणी केली. या भाषणात त्यांनी कार्यकर्ता आणि चळवळीतील तरुण याची व्याख्या ज्या मुद्देसूद पद्धतीने आमच्यासमोर ठेवली तीच आमच्या आजपर्यंतच्या प्रवासाची आणि जे मिळाले त्या यशाची पायाभरणीच होती. आजही त्यांनी त्या वेळी मांडलेली चळवळीतील तरुणाची दिशा आमच्या डोक्यात पक्की बसलेली आहे आणि माझ्यासहित अनेक तरुण त्याच मार्गावर चालत आहेत.

भाजप जेव्हा सत्तेत नव्हता त्या वेळी आम्ही महाविद्यालयीन चळवळ, नंतर भाजपा युवा मोर्चा यामध्ये काम करीत होतो. हे करतानाच मी वकिलीचे शिक्षण पूर्ण करून वकिलीचा व्यवसाय करू लागलो होतो. या काळातही मला अरुणजींबद्दल आकर्षण राहिले ते एक वकील म्हणून. त्यांचा कायदेविषयक आणि देशाच्या घटनेचा असलेला अभ्यास यामुळे त्यांना ऐकणे, भेटणे, त्यांनी लिहिलेले वाचणे हे सतत होतच राहिले. त्यानंतरची त्यांची एक भेट मला कायम स्मरणात राहील अशी होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी गडकरी होते. त्या वेळी काश्मीरबाबत भाजपची जी भूमिका होती त्याची एक डॉक्युमेंटरी तयार करायचे ठरले. ते काम पक्षाने माझ्यावर सोपवले. मग मी त्यासाठी एक टीम तयार केली. सहा महिने त्यासाठी मेहनत घेऊन काश्मीर विषयातील भाजपतील आणि संघ परिवारातील जे अभ्यासक आहेत त्यांना भेटलो. त्यांच्याकडून र्सवकष माहिती गोळा करून आवश्यक असणारे फुटेज, ठायाचित्रे जमा झाल्यावर एक लघुपट आम्ही तयार केला. आता हा लघुपट बरोबर झाला आहे की नाही हे जाणकार म्हणून कुणाकडून तपासून घ्यावी, असा प्रश्न जेव्हा भाजपच्या वर्तुळात उपस्थित झाला त्या वेळी एकच नाव पुढे आले ते म्हणजे अरुण जेटली. मग मी त्यांना दिल्लीला भेटायला गेलो. त्यांच्या तळघरातील कार्यालयात मी गेलो. त्यांना लघुपट दाखवायला सुरुवात केली. अनेक वेळा ते डोळे मिटत होते. काही तरी लिहीत होते. एकूणच त्यांचा हा पवित्रा पाहून मी तसा मनातून घाबरलो होतो. बहुदा त्यांना यांतील काहीच आवडले नसावे की काय, असा स्वाभाविक प्रश्न माझ्या मनात आला. लघुपट पूर्ण झाल्यावर ते मला म्हणाले की, हेच जर अशा पद्धतीने मांडले तर.. त्यांनी कागदावर त्यांच्याकडच्या माऊंटब्लँकच्या पेनने एक सलग स्क्रिप्ट लिहिली. काश्मीर विषयावर राजकीय, सामाजिक, आंतरराष्ट्रीय, आरक्षण,  पाकिस्तान अशा सर्व विषयांवर त्यांचा अभ्यास आणि त्या विषयांवरचे विवेचन त्यांनी मांडले. त्यावरून त्यांचा अभ्यास आणि विलक्षण ध्यास आणि बुद्धिमत्ता मला अनुभवता आली. आमच्या लघुपटाची उंचीच त्यांनी वाढवली. पुढे हा लघुपट देशभर भाजप कार्यकर्त्यांना दाखविण्यात आला. त्यामध्ये स्वाभाविक काश्मीरवर ३७० कलम आणि ३५ ए हे कसे अन्यायकारक आहे याची मांडणी त्यांनी केली होती. आता ३७० कलममुक्त काश्मीरमध्ये ते प्रत्यक्षात जाऊ शकले नाहीत याची खंत आज वाटत आहे.

अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला त्या वेळी मी मुंबई भाजपचा अध्यक्ष होतो. मी त्याचे अर्थसंकल्पावरील भाषण मुंबईत एनसीपीएमध्ये आयोजित केले. ते आले आणि अत्यंत साध्या सोप्या शब्दांत त्यांनी देशाचा अर्थसंकल्प, त्याची दिशा, देशासमोरी आव्हाने, प्रश्न आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश कोणत्या दिशेने जाणार आहे याचा एक रोडमॅप भाजप पदाधिकारी आणि मुंबईतील काही अभ्यासकांसमोर मांडला. ते भाषण मला आजही आठवते. एवढय़ा प्रचंड मोठय़ा देशाचा प्रचंड मोठा अर्थसंकल्प, त्यातील तांत्रिक बाबी, तरतुदी आणि नेमकी दिशा सोप्या पद्धतीने समजावून कशी सांगता येऊ शकते हा त्यांनी एक वस्तुपाठच आमच्यासमोर ठेवला.

त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मुंबईत विलेपाल्रे येथे आम्ही न्यू इंडिया या विषयावर बुद्धिवंतांचे संमेलन आयोजित केले होते. त्यामध्ये ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी केलेली मांडणी ही दिवसेंदिवस चर्चामंथन करून केली आहे की काय, अशी वाटावी अशी होती. संविधानामध्ये सांगितलेला समानतेचा व समान संधीचा धागा त्यात पदोपदी दिसत होता. एखाद्या पक्षाने आपल्या विजयासाठी कुठलीही, कोणतीही आश्वासने द्यावीत, ती पूर्ण होतील न होतील याची काळजी न करता, ती कायद्यात बसतील न बसतील याची तमा न बाळगणारे बरेच राजकीय पक्ष आपण पाहिले, पण ‘न्यू इंडिया’च्या संकल्पनेमध्ये भारताच्या संविधानाच्या प्रिएंबलमध्ये असलेली समान संधी आणि समान ध्येयावर आधारित,  घटनेच्या चौकटीत पक्षाची आश्वासने आणि भविष्यातील मार्गक्रमणा असावी हे जे भाजपच्या जाहीरनाम्याचे यश आहे, ज्याला जनतेने पािठबा दिला त्याचा पाया कोणी रचला असेल तर तो अरुण जेटली यांनी.

राजकीय विषयावर किंवा राजकीय आवश्यकतेपोटी पक्षाची किंवा सरकारची भूमिका समजण्यासाठी एक आगळीवेगळी भूमिका आणि मांडणी हे प्रत्येकाला जमतेच असे नाही. ते काही जणांना जमते त्यांतील अग्रणी नेते अरुण जेटली होते. त्यामुळे आजही बोफोर्सवर त्यांनी केलेली भाषणे पाहिली असता त्या व्यवहारातील  दोषारोपण आणि नेमकी चूक हे त्यांच्यापेक्षा आणखी कोणी सांगू शकत नाही. राफेलचा कपोलकल्पित मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला त्यानंतरसुद्धा त्यांनी विरोधक कशी चुकीची मांडणी करीत आहेत, सत्य काय आहे, संरक्षणात्मक पातळीवरचे काय वास्तव आहे हे त्यांनी मुद्देसूदपणे मांडले.

निवडणुकीच्या काळामध्ये ज्या वेळी काँग्रेस आणि विरोधकांनी मोदी व इतरांबाबत निवडणूक आचारसंहितेचा मुद्दा उपस्थित केला त्या वेळी घटनात्मकदृष्टय़ा आचारसंहितेची भूमिका आणि मर्यादा याचे त्यांनी केलेले विवेचन, देशाचा जीडीपी मोजण्याचे निकष आणि गरिबी आणि गरिबीचे निर्मूलन याबाबत त्यांनी मांडलेली भूमिका या कधीच विसरल्या जाणाऱ्या गोष्टी नाहीत. म्हणून भूमिका आणि मांडणी एवढेच नाही तर नव्या शब्दावलींना त्यांनी जन्म दिला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ज्या वेळी पुरस्कारवापसी सुरू झाली आणि एका लोकप्रिय नेत्यावर आघात केला जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली, त्या वेळी त्यांनी जन्माला घातलेला ‘स्युडो लिबरल’ हा शब्द किंवा ३७० कलम काढल्यानंतर त्याचे विश्लेषण करताना काँग्रेसची ‘हिस्टॉरिकल काँग्रेस’ या शब्दातली निर्भर्त्सना आणि आजच्या भारतातील युवकाचे वर्णन करताना ‘अ‍ॅस्पिरेशनल इंडिया’ असा केलेला उल्लेख त्यांच्या हातोटीची साक्ष देतो. ‘मॅन्युफॅक्चरर ऑफ फेकरी’, ‘को-अलायनेशन ऑफ रायव्हल्स’ ही त्यांच्या शब्दचातुर्याची आणखी काही उदाहरणे..

अरुणजी आयुष्यात निष्कलंक राहिले. खऱ्या अर्थाने त्यांची उंची त्यांना विरोध करणाऱ्या  विरोधकांच्या ‘उंची’वरून दिसून येते. त्यांचेही पक्षांतर्गत टीकाकार होते. त्यांची नावे सांगायला हरकत नाही.. यशवंत सिन्हा, अरुण शौरी, राम जेठमलानी अशांची टीका काही वेळा व्यक्तिगत पातळीवर जायची. तरीही वैचारिक विरोधक त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर एकही डाग लावू शकले नाहीत. ते एकदम निष्कलंक आयुष्य जगले हे आजच्या पिढीला नवी दिशा देणारे ठरावे.

He was master of Constitution.. He was Crusader against corruption… Leader in Crisis…!