करोनाच्या संकटाचा परिणाम जगभरातील आर्थिक घडामोडींवर झाला आहे. करोनामुळे जगभरातील अर्थव्यस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात तसंच रिव्हर्स रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी दिली. दरम्यान, २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर शून्याखाली जाणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. यावरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. “जर अर्थव्यवस्था वाढीचा दर शून्याखाली जाणार आहे, तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर त्यात अधिक भांडवल ओतण्याची काय गरज,” असा सवाल त्यांनी केला आहे.

शुक्रवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी शुक्रवारी भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर शून्याखाली राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. यावरून चिदंबरम यांनी सरकारवर टीका केली आहे. “रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणतात मागणीमध्ये मोठी घट झाली आहे. २०२०-२१ मध्ये जर अर्थव्यवस्था वाढीचा दर शून्याखाली जाणार आहे, तर त्यांना अर्थव्यवस्थेत अधिक भांडवल ओतण्याची काय गरज आहे? त्यांनी सरकारला सांगायला हवं तुम्ही तुमच काम करा, आर्थिक उपाययोजना करा,” अशा आशयाचं एक ट्विट त्यांनी केलं आहे.

आणखी वाचा- स्थलांतरित मजुरांचा मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने हाताळता आला असता – नीती आयोग

“रिझर्व्ह बँकेच्या विधानानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वृद्धी दराच्या १ टक्क्यांपेक्षाही कमी पॅकेजसाठी स्वत:ची प्रशंसा करून घेता?,” असं म्हणत त्यांनी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांवरदेखील हल्लाबोल केला. “नकारात्मक विकासाच्या क्षेत्रात सरकारनं अर्थव्यवस्थेला कसं ओढलं याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लाज वाटली पाहिजे,” असंही ते म्हणाले.