आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी खळबळजनक दावा केला आहे. आगामी निवडणुकीत महाआघाडीचा विजय होईल आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती या पंतप्रधान पदाच्या दावेदार असतील, असे सांगताना त्यांनी राहुल गांधी पुढचे पंतप्रधान नसतील हेही स्पष्ट केले आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मायावतींचे नाव सर्वांत पुढे असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या जागांमध्ये फक्त दुपटीने वाढ होत ८८ ते ९० पर्यंतच मजल मारता येईल, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलवर येथील रामगड विधानसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर नटवर सिंह यांचा मुलगा जगत सिंह निवडणूक लढवत आहे. त्यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर नटवर सिंह बोलत होते. भारताच्या राजकारणात उत्तर प्रदेशची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळेच मायावती यांची पंतप्रधान होण्याची जास्त शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले. महाआघाडीवरून ते म्हणाले की, पंतप्रधान अजून पर्यंत दक्षिण भारत समजू शकलेले नाहीत. कारण त्यांना कोणताच दृष्टीकोन नाही. जो काँग्रेसचा संपूर्ण भारतासाठी दृष्टीकोन होता. तो मोदींकडे नाही. महाआघाडी होणार, हे कोलकातातून सिद्ध झाले आहे. तीन राज्यातील पराभवानानंतर मोदींची प्रतिमा ढासळली आहे. राज्याचे नेतृत्व करणे वेगळे आणि देशाचे नेतृत्व करणे वेगळे असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

राजस्थान सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले की, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेद पाहता काँग्रेसचे सरकार जास्त दिवस टिकू शकणार नाही. सोनिया गांधी यांच्यामुळे पक्षात एकजूट कायम आहे. त्यांच्यानंतर पक्षात फूट पडणार हे निश्चित आहे, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली.

महाआघाडीबाबत बोलताना नटवर सिंह म्हणाले की, ज्यापद्धतीने आघाडीची स्थापना झाली आहे. त्यावरून महाआघाडीचा विजय निश्चित आहे. भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरेल पण बहुमतापासून ते दूर राहतील.

यावेळी त्यांनी मायावती यांचे कौतुक करताना पंतप्रधान पदाच्या त्या दावेदार असल्याचे सांगितले. आर्थिक दृष्ट्या मागासांच्या आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले की, निवडणुकीच्या तीन महिने आधी आरक्षण लागू करण्याला महत्व नाही. लोक न्यायालयात जातील. एक वर्षांपूर्वी हेच आरक्षण आणले असते तर ते चांगले झाले असते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former foreign minister and congress leader natwar singh said mayawati could be next pm
First published on: 22-01-2019 at 12:15 IST