गोव्यातील लुइस बर्जर लाचप्रकरणी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना स्थानिक न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची पोलिसांनी मागणी केल्यास आपण त्याला विरोध करणार नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट केले आहे.
गोव्यातील काँग्रेस नेते दिगंबर कामत हे माजी मुख्यमंत्री आहेत म्हणूनच केवळ त्यांना साक्षीदारांवर प्रभाव टाकणारी व्यक्ती असे संबोधता येणार नाही, असे स्थानिक न्यायालयाने स्पष्ट केले. कामत हे तपासात सहकार्य करीत असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. कामत यांना यापूर्वी अंतरिम संरक्षण देण्यात आले होते. आता जिल्हा न्यायमूर्ती बी. पी. देशपांडे यांनी त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र त्यासाठी कामत यांना एक लाख रुपयांची हमी सादर करण्यास सांगण्यात आले आहे. सदर लाचप्रकरणाची गुन्हा अन्वेषण विभाग चौकशी करीत असून त्यांना सहकार्य करण्याचे आणि पुराव्यांमध्ये फेरफार न करण्याचे आदेशही कामत यांना देण्यात आले आहेत.