जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचं प्रदीर्घ आजाराने काल रात्री उशिरा निधन झालं. दिल्लीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाने राजकीय विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगमोहन यांच्या निधनाने राष्ट्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणतात, जगमोहनजी यांच्या निधनाने राष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. ते अत्यंत कुशल प्रशासक आणि बुद्धिमान व्यक्ती होते. त्यांनी कायम देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी काम केलं आहे. त्यांच्या आधुनिक आणि कल्पक धोरणांमुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मी त्यांच्या परिवाराप्रती आणि त्यांच्या हितचिंतकांप्रती संवेदना व्यक्त करतो.

तर जगमोहन यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत गृहमंत्री अमित शाह यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

जगमोहन हे १९८४ ते १९८९ आणि नंतर जानेवारी १९९० ते मे १९९० या काळात ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. १९९६साली त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली आणि केंद्रिय शहरी विकास आणि पर्यटन मंत्री म्हणूनही ते काही काळ कार्यरत होते.