माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना मोठ्या नाट्यानंतर बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. आयएनएक्स मीडिया कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी चार दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. त्यानंतर आता त्यांच्या संपत्तीबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. चिदंबरम यांच्याकडे केवळ देशातच नाही तर परदेशातही कोट्यवधींची संपत्ती आहे. एफडी आणि त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हेदेखील तब्बल 8.6 कोटी रूपये आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी घोषित केल्याप्रमाणे त्यांच्याकडे सध्या 175 कोटी रूपयांची संपत्ती आहे.

चिदंबरम आणि त्यांच्या पत्नीकडे तब्बल 95 कोटींपेक्षा अधिकची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आपल्यावर 5 कोटी रूपयांचे कर्ज आहे, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तर कार्ती चिदंबरम यांच्याकडेही 80 कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं वार्षिक उत्पन्न 9.75 कोटी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, चिदंबरम यांनी अन्य संस्थांमध्ये 25 कोटी जमा आहेत आणि त्यांच्याकडे पाच लाखांची रोकडही असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यांच्याकडे 13.47 कोटी रुपयांचे शेअर्स, डिबेंचर्स आहेत. तर काही योजनांमध्येही त्यांनी 35 लाखांची गुंतवणूक केली आहे. तर दुसरीकडे त्यांच्याकडे दहा लाखांच्या विमा, 85 लाखांचे दागिने आणि 27 लाखांच्या गाड्या, ब्रिटनमध्ये 1.5 कोटी, 7 कोटींची शेतजमीन, 45 लाखांच्या व्यवसायिक इमापकी आणि 32 कोटी रूपयांची घरे आहे.

पी. चिदंबरम आणि कार्ती चिदंबरम यांच्याकडे परदेशात 25 संपत्ती असल्याची माहितीही सीबीआयकडून देण्यात आली. तसेच ही संपत्ती कंपनीच्या नावावर खरेदी करण्यात आल्याचेही सीबीआयच्या वकीलांनी सांगितलं. त्याचप्रमाणे ईडीने आतापर्यंत त्यांची 54 कोटी रूपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये भारत, ब्रिटन आणि स्पेनमधील संपत्तीचा समावेश आहे. यामध्ये तामिळनाडूतील शेतजमीन, दिल्लीतील बंगला, ब्रिटनमधील कॉटेज आणि घर, स्पेनमधील टेनिस क्लब, चेन्नईच्या बँकेतील एफडीचा समावेश आहे.