भारतीय वायुसेनेचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल इद्रिस हसन लतीफ यांचे दिल्ली येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. लतीफ ९४ वर्षांचे होते. सप्टेंबर १९७८ ते ऑगस्ट १९८१ या काळात ते भारतीय वायुदलाचे प्रमुख होते अशी माहितीही समोर आली आहे.
एस्पिरेशन निमोनिया झाल्याने लतीफ यांना २५ एप्रिलला दिल्लीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. संरक्षण मंत्री निर्मला सीतरामन यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
लतीफ यांच्या निधनाने खूप दुःख झाल्याचे सीतारामन यांनी सांगितले तसेच लतीफ यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे असेही त्या म्हटल्या. देशासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहिल असेही सीतारामन यांनी म्हटले आहे. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर हैदराबाद या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत असेही समजते आहे. लतीफ यांना १९८१ नंतर महाराष्ट्राचे राज्यपाल पदही देण्यात आले होते. तसेच फ्रान्समध्येही भारताचे राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2018 7:06 am