भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात झाला आहे. फ्रान्समधील ‘शेवेलियर डी लॉर्ड नॅशनल डी ला लिगियन दी ऑनर’ हा पुरस्कार किरण कुमार यांना गुरुवारी प्रदान करण्यात आला. भारत आणि फ्रान्समधील अवकाशसंशोधनाच्या कार्यामध्ये प्रमुख भूमिका पार पाडल्याबद्दल किरण कुमार यांचा सन्मान करण्यात आल्याचे फ्रान्समार्फत सांगण्यात आले आहे. फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीने भारतातील फ्रान्सचे राजदूत अॅलेकझॅण्डर जीगलर यांनी दिल्लीमधील फ्रान्सच्या दुतावासात हा पुरस्कार किरण कुमार यांना प्रदान केला.

‘दोन्ही देशातील अवकाश संशोधन तंत्रज्ञानाला किरण कुमार यांनी आपल्या कार्याने एक नवीन उंचीवर नेले. याचसाठी फ्रान्स सरकारने त्यांचा हा सन्मान केला आहे’, असे मत फ्रान्सची अवकाश संशोधन संस्था असणाऱ्या ‘सीएनइएस’चे अध्यक्ष जीन येव्स ले गाल यांनी व्यक्त केले. ‘इस्रोमध्ये किरण यांनी दिलेले योगदान मौल्यवान आहे. येथे काम करुन त्यांनी केलेले कार्यकरणे सोपे नव्हते तरी त्यांनी ते अगदी सहजपणे यशस्वीरित्या पूर्ण केले. २०१५ ते २०१८ दरम्यान इस्रोचे अध्यक्षपद भूषवताना किरण यांनी केवळ भारत आणि फ्रान्समधील अवकाश संशोधनाला चालना तर दिलीच मात्र दोन्ही देश एकत्र काम करतील याकडे विशेष लक्ष दिले’, अशा शब्दांमध्ये गाल यांनी किरण यांचे कौतूक केले.

‘शेवेलियर डी लॉर्ड नॅशनल डी ला लिगियन दी ऑनर’ हा पुरस्कार देण्याची सुरुवात १८०२ मध्ये नेपोलियन बोनापार्टने केली होती. हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून फ्रान्सच्या प्रगतीमध्ये हातभार लावणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. भारतामधील ‘भारतरत्न’ पुरस्काराप्रमाणेच हा पुरस्कार इतर देशांच्या व्यक्तींनाही त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानासाठी प्रदान केला जातो.