जदयूचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात पाटण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका इंजिनिअरने त्यांच्यावर ‘बिहार की बात’ या कॅम्पेनच्या चोरीचा आरोप केला आहे. तक्रारीनंतर त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रशांत किशोर यांच्याव्यतिरिक्त पाटणा विद्यापीठातील विद्यार्थी नेता ओसामा याचंही नाव एफआयआरमध्ये आहे. शाश्वत गौतम यांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी ‘बिहार की बात’ नावाचा एक प्रोजेक्ट तयार केला होता. तो प्रोजेक्ट लाँच करण्यावर सध्या कामही सुरू होतं. परंतु ओसामा यानं त्यांच्याकडील ‘बिहार की बात’ची संपूर्ण माहिती प्रशांत किशोर यांना दिली. यानंतर प्रशांत किशोर यांनी आपल्या वेबसाईटवर त्याची माहिती टाकून त्याचं ब्रँडिंग सुरू केल्याचंही सांगण्यात येत आहे.

प्रशांत किशोर यांनी २० जानेवारी रोजी ‘बिहार की बात’ हा कार्यक्रम सुरू केला होता. त्यांच्या या कार्यक्रमाला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. काही वेळातच त्यांच्या या कार्यक्रमाशी तीन लाख लोक जोडले गेले होते. या कार्यक्रमाशी युवकांना जोडण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. तसंच पुढील १०० दिवसांमध्ये १० लाख लोकांना जोडण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.

या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे :प्रशांत किशोर
एका व्यक्तीनं केवळ दोन मिनिटांच्या प्रचारासाठी हे सर्वकाही केलं आहे. सर्व तपास यंत्रणांनी नि:पक्षपाती तपास केला पाहिजे आणि सत्य समोर आणले पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रशांत किशोर यांनी दिली.