प्रश्न विचारताच तुम्ही देशद्रोही, चिनी एजंट, गद्दार, हिंदू आणि लष्करविरोधी घोषित होऊ शकता अशा शब्दांत जेएनयूचे माजी विद्यार्थी आणि सीपीआय नेते कन्हैय्या कुमार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कन्हैय्या कुमार यांनी ट्विट करुन नोटाबंदी, जीएसटी, पुलवामा हल्ला आणि लडाखमधील चकमकीसंबंधी प्रश्न उपस्थित करत असं केल्यावर तुम्ही देशद्रोही घोषित होऊ शकता असं म्हटंल आहे.

कन्हैय्या कुमार यांनी ट्विटमध्ये नोटाबंदी केल्याने काळा पैसा आला का? जीएसटीमुळे कर चोरी थांबली का? पुलवामा हल्ल्यातील दोषी पकडले गेले का? गलवान खोऱ्यात सगळं काही ठीक आहे का? असे प्रश्न विचारले आहेत. यानंतर त्यांनी उपहासात्मकपणे टीका करत सावधान राहा, प्रश्न विचारताच तुम्ही देशद्रोही, चिनी एजंट, गद्दार, हिंदू आणि लष्करविरोधी घोषित होऊ शकता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व लडाखमध्ये भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही आणि लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत, असं विधान सर्वपक्षीय बैठकीत केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन यांनीदेखील प्रश्न विचारणाऱ्यावंर टीका केल्याबद्दल मोदी सरकारला धारेवर धरलं आहे.

नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा विरोध करणारे वक्तव्याचा विपर्यास लावत आहेत अशी टीका केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याने कमल हासन यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही वा लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं. “प्रश्न विचारणं देशविरोधी होत नाही. आपल्या घटनेने प्रश्न विचारण्याचा हक्क दिला आहे आणि जोपर्यंत सत्य ऐकायला मिळत नाही आम्ही प्रश्न विचारत राहणार,” असं कमल हासन यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शनिवारी सकाळी ट्वीट करून त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं. चिनी सैनिक भारताच्या भूभागात घुसले नव्हते, तर मग जवान शहीद कसे झाले? जवान नेमके कुठे (भारताच्या की चीनच्या हद्दीत) शहीद झाले, असे प्रश्न विचारण्याबरोबरच चिनी आक्रमणासमोर पंतप्रधानांनी माघार घेतली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. यासोबतच नरेंद्र मोदींवर टीका करताना सरेंडर मोदी असा उल्लेख केला आहे.