जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला कोर्टाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उमर खालिदला रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. उमर खालिदला कडकडडूमा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टात पोलिसांनी त्याच्या दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. जी कोर्टाने मान्य केली आहे. बेकायदा कृत्यरोधी कायद्यांतर्गत (UAPA) उमर खालिदला अटक करण्यात आली. इंडियन एक्स्प्रेसला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी उमर खालिदला चौकशीसाठी बोलवले होते. रविवारी लोदी कॉलनीमध्ये त्याला विशेष सेल कार्यालयात तपासासाठी सहभागी होण्यास सांगितलं. त्यानंतर रविवारी तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला दिल्ली पोलिसांनी अटक केली. आता कोर्टाने उमर खालिदला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

उमर खालिदच्या वकिलांनी त्याला पोलीस कोठडी देण्याच्या मागणीचा कोर्टात विरोध दर्शवला. उमर खालिदच्या जिवाला धोका आहे. उमर खालिदने सीएएचा विरोध केला. सरकारच्या निर्णयाचा विरोध करणं हा अपराध कसा काय ठरु शकतो? असं म्हणत पोलीस कोठडी न देण्याची विनंती त्यांनी केली. मात्र कोर्टाने त्यांची विनंती मान्य केली नाही.

दिल्ली पोलिसांनी मार्च २०२० मध्ये उमर खालिदच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. ज्यामध्ये चिथावणीखोर भाषण देणं, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याच्या वेळी लोकांना आंदोलनासाठी भडकवणे यासहीत इतरही काही आरोप आहेत. उमर खालिदवर हिंसाचार भडकवण्यासाठी उद्युक्त करण्याचा आणि हिंसा घडवून आणण्यासाठी कट रचल्याचाही आरोप आहे.

कोण आहे उमर खालिद?
खलिदचा परिवार ३ दशकांपूर्वी महाराष्ट्रातील अमरावतीमधून दिल्ली येथे स्थानिक झाला. उमर खलिद हा झाकिरनगर परिसरात राहायचा. त्याचे वडील हे उर्दू मासिक चालवत. जेएनयूतील समाजशास्त्र विभागातून उमर खालिदने इतिहास या विषयात एमए आणि एम- फिल केले आहे. सध्या तो जेएनयूतून पीएचडी करत आहे. २०१६ मध्ये संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरू याच्यासंदर्भात विद्यापीठ परिसरात झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा देण्यात आल्याचे समोर आले. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अन्य मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासूनच देशभरात उमर खालिद चर्चेचा विषय ठरला.