लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. बलराम जाखड यांचे बुधवारी येथे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
डॉ. जाखड हे १९८० ते १९८९ या कालावधीत लोकसभेचे अध्यक्ष होते. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात डॉ. जाखड यांनी कृषिमंत्रिपदही भूषविले होते. जून २००४ ते मे २००९ या कालावधीत ते मध्य प्रदेशचे राज्यपाल होते.
डॉ. जाखड यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. डॉ.जाखड हे लोकप्रिय नेते होते आणि आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी संसदीय लोकशाही अधिक समृद्ध केली, असे मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. संसदीय प्रणाली जिवंत ठेवण्यासाठी डॉ. जाखड यांच्यासारख्या लोकनेत्यांची नितांत गरज आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी आवश्यक असणारी निर्णयक्षमता, चिकाटी, ठामपणा, संवाद साधण्याची कला, निर्भिडता आणि कठोरपणा हे गुण जाखड यांच्याकडे होती. त्यामुळे ते या पदावर यशस्वी ठरले, असे मतही मोदी यांनी यावेळी व्यक्त केले. मंत्रीमंडळातील नेत्यांनीही डॉ. जाखड यांच्या निधनावर दुख व्यक्त केले.

चांगला सहकारी गमावला – राष्ट्रपती
पीटीआय, नवी दिल्ली
डॉ. बलराम जाखड यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. सार्वजनिक जीवनात त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने आपण एक चांगला सहकारी आणि अनेक वर्षांपासूनचा जवळचा मित्र गमावला आहे, असे मुखर्जी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
ते म्हणाले की, डॉ. जाखड यांनी सामाजिक क्षेत्रात प्रभावी कार्य केले त्यामुळेच त्यांना प्रभावी राजकीय कारकिर्द लाभली. त्यांच्यासारख्या नेत्याची भारतात निश्चिपणे उणीव जाणवेल. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही डॉ. जाखड यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सार्वजनिक जीवनातील विशेषत: शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी केलेले कार्य नेहमीच स्मरणात राहील. शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेवून त्यावर कार्यवाही करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा, असे सोनिया गांधी यांनी पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे.