माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचे फेसबुक अकाउंट ब्लॉक झाले आहे. बिहार विधानसभा निवडणुक जवळ आलेली असताना, हा प्रकार घडल्याचं समोर आल्याने काँग्रेस देखील यावरून आक्रमक झाली आहे. शिवाय, मीरा कुमार यांनी स्वतः या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

“फेसबुक पेज ब्लॉक केले गेले! असे का? लोकशाहीवर आघात! हा केवळ योगायोग असू शकत नाही की, बिहार विधानसभा निवडणुकीच्या अगोदर फेसबुकडून माझे पेज ब्लॉक केल्या जाते.” अशा शब्दांमध्ये मीरा कुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियामधील एक माध्यम असलेल्या फेसबुकवर एकपक्षीय असण्याचे आरोप देशात अनेवेळा लावले गेले. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ता रणदीपसिंह सुरजेवाला यांनी देखील एक ट्विट केलं आहे. सुरजेवाला यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या व माजी लोकसभा अध्यक्ष मीर कुमार यांचे फेसबुक अकाउंट ब्लॉक करण्यात आल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे.

सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आम्ही पाहिले आहे की, फेसबुक इंडियाच्या नेतृत्वाने मोदी सरकारच्या धोरणानुसार कशी तडजोड केली होती. आता माजी लोकसभा अध्यक्ष व काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याचे अकाउंट ब्लॉक केल्याने सिद्ध होते की, विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबण्यासाठी घाणरडे डावपेचांचा वापर केला जात आहे.”

मीरा कुमार यांनी ट्वटिद्वारे आपली प्रतिक्रिया देताना, आपल्या फेसबुक पेजचा स्क्रीन शॉट देखील शेअर केला आहे. ज्यावर फेसबुकडून लिहिले गेले आहे की, तुमचे पेज अनपब्लिश आहे.