लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि खासदार पूर्नो अगितोक संगमा (६८) यांचे शुक्रवारी राहत्या घरी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. संगमा यांच्या निधनाबद्दल लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी शोक व्यक्त केला आणि सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. ईशान्य भारतातून आलेल्या संगमा यांनी केंद्रीय पातळीवर आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला होता.
शरद पवार यांच्यासोबतच संगमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. १९९६ ते ९८ या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष होते. त्यांनी १९८८ ते ९० या काळात त्यांनी मेघालयाचे मुख्यमंत्रीपदही भूषविले होते. आठवेळ संगमा लोकसभेवर निवडून गेले. सध्याच्या सोळाव्या लोकसभेमध्येही ते तुरा या मतदारसंघाचे नेतृत्त्व करीत होते. २०१२ मध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संगमा यांनी प्रणव मुखर्जी यांच्याविरोधात लढत दिली होती. या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीवेळीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. लोकसभेचे अध्यक्ष असताना चेहऱ्यावरील हास्य ठेवून काम करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे ते सर्वांचे लाडके बनले होते. संगमा यांच्या निधनाबद्दल दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अनेकांनी शोक व्यक्त केला.